रोहित शर्मा आणि त्याचे चाहते हे एक वेगळंच समीकरण आहे. हिटमॅनचे चाहते असलेल्या गीतेश ठाकूर व ममता ठाकूर दांपत्याला मुलगी झाली. या दांपत्याने मुलीचं नाव समायरा ठेवलं. रोहित शर्माच्या मुलीचं नाव समायरा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी रोहितने चालत नाचत जात जेतेपदाचा करंडक आयसीसीचे प्रमुख जय शाह यांच्या हस्ते स्वीकारला होता. याच धर्तीवर या दांपत्याने मुलीचं नाव ठेवताना नृत्य केलं. मुलीच्या बारशावेळी समायरा नाव लिहिलेल्या जर्सीचं अनावरण त्यांनी केली.

रोहित शर्माने हा व्हीडिओ पाहिला. चाहत्यांच्या विनंतीला मान देत रोहितने या दांपत्याला आणि बाळाला शुभेच्छा दिल्या आहेत. पांढऱ्या टीशर्टमधला रोहित व्हीडिओत बोलताना दिसतो. रोहित बोलू लागतो, ठाकूर फॅमिली- तुम्हाला शर्मा कुटुंबीयांकडून खूप साऱ्या शुभेच्छा! तुम्हाला मुलगी झाली, आम्हाला आनंद झाला. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.

रोहितच्या या कृतीने ठाकूर कुटुंबीय भारावून गेले. ‘स्वप्न पूर्ण झालं, रोहित सरांनी आमचा व्हीडिओ पाहिला आणि आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या’, अशा कॅप्शनसह ठाकूर कुटुंबीयांनी व्हीडिओ शेअर केला आहे. रोहितचा चाहता असलेल्या दीपक धाडवे याने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ शेअर केला आहे.

संपूर्ण ठाकूर कुटुंबीयांनी जल्लोष करत रोहित शर्माला धन्यवाद दिले आहेत.