भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामन्यानंतर आता वनडे मालिका खेळवली जाणार आहे. एकमेव कसोटी सामन्यात भारताने ३०० धावा आणि एका डावाने मोठा विजय मिळवला. यानंतर आता १३ जूनपासून होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्मा व हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे विराट कोहली आधीच या मालिकेतून बाहेर झाला आहे, यानंतर आता या दोन खेळाडूंबद्दल अपडेट समोर आली आहे.
अफगाणिस्तानविरूद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा पूर्वीच करण्यात आली होती. पण रोहित शर्मा व हार्दिक पंड्या फिटनेसच्या कारणामुळे मालिकेबाहेर होण्याची शक्यता होती. पण आता दोन्ही खेळाडू या मालिकेत खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही खेळाडू फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाल्यामुळे, अफगाणिस्तानविरुद्धच्या त्यांच्या सहभागाबद्दलची उत्सुकता आता संपली आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने रोहित आणि हार्दिक यांना फिटनेससाठी मंजुरी दिली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्या १४ महिन्यांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोहित शर्मा या वर्षी जानेवारीनंतर एकदिवसीय सामना खेळण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२६ दरम्यान रोहित आणि हार्दिक दोघांनाही दुखापत झाली होती. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, तर हार्दिक पंड्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. मात्र, आता दोघेही त्यांच्या दुखापतींमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. हार्दिक पंड्या २ जूनपासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, २ जूनपासून पंड्याने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सामन्याशी संबंधित सर्व गोष्टी केल्या आहेत. त्याने १० षटकं गोलंदाजीही केली असून, सर्व काही ठीक आहे, ही चांगली बातमी आहे. हार्दिकला कोणतीही अडचण जाणवत नाही.
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या भारताच्या तयारीसाठी अफगाणिस्तानविरुद्धचे तीन एकदिवसीय सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे, रोहित आणि हार्दिक यांचं फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होणं हे केवळ भारतीय संघासाठीच नव्हे, तर क्रिकेट चाहत्यांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जून रोजी धरमशाला येथे खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना १७ जून रोजी लखनौ येथे होईल. तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना २० जून रोजी चेन्नई येथे खेळला जाईल.
