Rohit Sharma Viral Video: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. केवळ एकच फॉरमॅट खेळत असलेल्या विराट आणि रोहितने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी केली. दोघांनी दमदार शतकं झळकावली. रोहितने पहिल्या सामन्यात सिक्कीम संघाविरूद्ध खेळताना १५५ धावांची खेळी केली होती. पण दुसऱ्या सामन्या त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला. मात्र, सामन्यानंतर त्याने असं काही केलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

रोहित स्वस्तात परतला माघारी

रोहित शर्माला सुरूवातीच्या २ सामन्यांसाठी मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं होतं. पहिल्या सामन्यात सिक्कीम संघाविरूद्ध धावांचा पाठलाग करताना त्याने १५५ धावा चोपल्या होत्या. दुसरा सामना उत्तराखंड संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यात मुंबईचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र, त्याला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला.

रोहितचा व्हिडीओ होतोय व्हायरल

रोहित फलंदाजीत फ्लॉप ठरला. पण सामना झाल्यानंतर त्याने असं काहीतरी केलं, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. रोहित शर्मासारखे अनुभवी खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधील सामने खेळणं हे युवा खेळाडूंसाठी नेहमीच फायदेशीर ठरतं. कारण त्यांना अनुभवी खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळते. यासह ते सामन्याआधी स्वत:ला कसं तयार करतात, हे जाणून घेण्याची संधी मिळते. दरम्यान मुंबई- उत्तराखंड सामना झाल्यानंतर रोहित उत्तराखंड संघातील खेळाडूंसोबत संवाद साधताना दिसून आला. त्याने युवा खेळाडूंना आपला अनुभव सांगितला. यासह त्यांना ऑटोग्राफ दिले आणि फोटो देखील काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबईचा उत्तराखंड संघावर दमदार विजय

या सामन्यात उत्तराखंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईकडून रोहित शून्यावर बाद होऊन माघारी परतला. तर मुशीर खानने ५५ आणि सर्फराज खानने देखील ५५ धावांची खेळी केली. यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेने नाबाद ९३ धावा करून मुंबईची धावसंख्या ७ गडी बाद ३३१ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या उत्तराखंड संघाला ९ गडी बाद २८० धावांपर्यंत मजल मारता आली.