Rohit Sharma Hilarious Reaction on Guwahati Weather Video: आयपीएल २०२६ मध्ये आजचा म्हणजेच ७ एप्रिलचा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार असून पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला आहे. गुवाहाटीमधील वातावरण अचानक बदलल्याने वातावरण थंड होत पावसाला सुरूवात झाली. अचानक बदललेलं वातावरण पाहून मुंबई इंडियन्सचे खेळाडू एकदम चकित झाले आणि रोहितची यावरील प्रतिक्रियादेखील भन्नाट होती.

गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ वेळेत मैदानात हजर झाले. पण अचानक वातावरण बदललं आणि थंड वारे सुटत वरूण राजाने उपस्थिती लावली. नाणेफेकीची वेळ होऊन गेल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि सामन्यासाठी मैदान सज्ज करण्याची लगबग सुरू झाली. पण तितक्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून आता पावसाची संततधार सुरू आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ टीम हॉटेलमध्ये स्टेडियमकडे जायला रवाना होतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यादरम्यान व्हीडिओग्राफरने सर्वात आधी कायरन पोलार्डला विचारलं की, “लंडन की गुवाहाटी काय वाटतंय?” पोलार्ड म्हणाला, “दोन्हीचं मिश्रण आहे.” त्यानंतर बाहेर आलेले बुमराह आणि तिलक वर्मादेखील वातावरण बघून चकित झाले.

तितक्यात रोहित शर्मा म्हणाला, “अरे बाहेर अचानक थंडी कशी पडली?” रोहितने आपल्या नेहमीच्या टोनमध्ये बोललेलं एक वाक्य चाहत्यांना चांगलंच भावलं आहे. रोहित शर्माचं या व्हीडिओमधील हे वाक्य व्हायरल होत आहे. रोहित पुढे गेल्यावर तिलक म्हणाला, “अरे लंडनला आलो भावा आपण.” तर हार्दिकदेखील बाहेर आल्यानंतर अचानक थंड जाणवल्याने चकित झाला आणि पुढे जाताना कुडकुडताना दिसला. मुंबई इंडियन्सचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना न झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण मिळणार आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंतचे तीन सामने जिंकले आहे. तर मुंबईने दोनपैकी एक सामना जिंकला आहे.