Rohit Sharma Wasim Akram Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ मधील सामना एकतर्फी झाला. या सामन्यात टीम इंडियाने तब्बल ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतरही भारत-पाकिस्तान संघातील खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं नाही. पण या सामन्यापूर्वीच्या रोहित शर्मा व वसीम अक्रम यांच्या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोमध्ये पाकिस्तानचे दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम व रोहित शर्मा यांच्यातील हलक्याफुलक्या क्षणांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सामन्यापूर्वीच्या समारंभादरम्यान दोघे गप्पा मारताना, एकमेकांना मिठी मारताना आणि हस्तांदोलन करताना दिसले. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
रोहित शर्मा हा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोलंबोमध्ये उपस्थित होता. रोहितने सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंची भेट घेत सर्वांशी संवाद साधला, हस्तांदोलन केलं आणि शुभेच्छा दिल्या. यानंतर आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम हे देखील रोहितसोबत मैदानावर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा क्षण मात्र रोहित आणि अकरम यांची भेट ठरली.
रोहित व अक्रम यांची भेट प्रसंग अधिक चर्चेत राहिला कारण तो भारताच्या पाकिस्तान संघासोबत ‘नो-हँडशेक’ भूमिकेच्या पार्श्वभूमीवर घडला. आशिया चषकापासून भारतीय संघाने ही भूमिका कायम ठेवली आहे. नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याच्यासोबत पारंपरिक हस्तांदोलन टाळल्याचं पुन्हा एकदा दिसलं.
सामन्याभोवतीचा तणाव आणि स्पर्धेची तीव्रता लक्षात घेतली तर रोहित-अक्रम यांचा हा क्षण वेगळाच भासला. दोन दिग्गज ट्रॉफीजवळ हसत-खेळत गप्पा मारताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसले, तर दुसरीकडे स्टेडियम पुढील रोमांचक अध्यायासाठी सज्ज होत होतं. या व्हीडिओवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी भारतीय संघाला ट्रोल करत डबल स्टँन्डर्ड असा उल्लेख केला आहे. तर रोहित शर्मा असल्यामुळे चाहते त्याची बाजू घेतानाही दिसले.
फक्त रोहित शर्माच नाही तर इतर भारतीय क्रिकेटपटूही पाकिस्तानी खेळाडूंशी गप्पा मारताना आणि विनोद करताना दिसले. हरभजन सिंग आणि मिसबाह-उल-हक एकत्र कॉमेंट्री करताना दिसले. सुनील गावस्कर आणि वकार युनूस देखील एकत्र दिसले. एकीकडे टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करत नाहीत, तर दुसरीकडे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू एकत्र या सामन्यादरम्यान दिसले.
