Rohit Sharma Hundred in Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने वादळी खेळी करत शतक झळकावलं आहे. विजय हजारे ट्रॉफीत मुंबईचा सामना सिक्कीम संघाविरूद्ध खेळवला जात आहे. २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा सलामीला उतरला आणि त्याने शतकी खेळी करत संघाला उत्कृष्ट सुरूवात करून दिली. रोहित शर्मा ७ वर्षांनंतर विजय हजारे स्पर्धा खेळण्यासाठी उतरला आहे.

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये रोहित शर्मा फलंदाजीला उतरला आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर शानदार षटकार खेचत आपले मनसुबे जाहीर केले. रोहितचा सामना पाहण्यासाठी १२ हजारहून अधिक लोक उपस्थित होते आणि रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना निराश केलं नाही. २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने मुंबईला धमाकेदार सुरुवात करून दिली. त्याने अंगक्रिश रघुवंशीबरोबर मिळून डावाला गती दिली. रोहितने पॉवरप्लेमध्ये चार षटकार आणि सात चौकार लगावले.

रोहित शर्माचं शानदार शतक

रोहितने २८ चेंडूत ५४ धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यामध्ये ५२ धावा त्याने चौकार-षटकारांच्या मदतीने केल्या. त्यानंतर रोहितने गियर बदलत पुढच्या ३५ चेंडूत शतक पूर्ण केलं. रोहितने ६२ चेंडूत ८ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १०० धावा शतकी खेळी साकारली. रोहित शर्माने लिस्ट ए क्रिकेटमधील ३८वं शतक झळकावलं आहे.

वनडेमधील जगातील नंबर वन फलंदाज असलेल्या रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफीत न्यूझीलंडविरूद्ध मालिकेची तयारी केली आहे. न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने भारताच्या सर्व खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचे आदेश दिले. ज्यामध्ये कमीत कमी दोन सामने खेळणं अनिवार्य आहे.

रोहित शर्माने यानंतरही आपली वादळी फलंदाजी कायम ठेवली आणि त्याने ९१ चेंडूत १५० धावा केल्या. यानंतर रोहित ९४ चेंडूत १८ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने १५५ धावा करत बाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहितने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं.