रोहित-द्रविड जोडी भारताला शिखरावर नेईल -शास्त्री

‘‘भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी रोहित पूर्णपणे सज्ज आहे.

रोहित शर्माच्या रूपात भारताकडे ट्वेन्टी-२० प्रकाराच्या कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. नवनिर्वाचित प्रशिक्षक राहुल द्रविडच्या साथीने रोहित भारताला नक्कीच शिखरावर नेईल, अशी आश्वासक प्रतिक्रिया भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताचे आव्हान संपुष्टात आल्याबरोबरच शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. याशिवाय विराट कोहलीसुद्धा ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्याने आता भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाला प्रारंभ होणार आहे. द्रविड मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारणार असून न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी सलामीवीर रोहितकडे नेतृत्वाची धुरा सोपवली गेली आहे.

‘‘भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी रोहित पूर्णपणे सज्ज आहे. गेल्या जवळपास दशकभरापासून तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा ‘आयपीएल’ जिंकली आहे. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वकौशल्याविषयी शंकाच नाही,’’ असे शास्त्री नामिबियाविरुद्ध झालेल्या लढतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

याव्यतिरिक्त कोहली एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याबाबत शास्त्री यांनी संकेत दिले. ‘‘विभाजित नेतृत्वाचा पर्याय भारतीय क्रिकेटच्या संस्कृतीत नसला, तरी तो वाईट नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या संघांनी या पद्धतीद्वारे यश साध्य करून दाखवले आहे. आधुनिक क्रिकेटमधील जैव-सुरक्षित परिघाचे आव्हान पाहता खेळाडूंवरील खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूने मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व केले, तर अन्य कर्णधार फक्त कसोटीवर लक्ष केंद्रित करू शकतो,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असून त्यानंतर २०२३मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘‘द्रविडला परिपक्व आणि प्रतिभावान भारतीय खेळाडूंचा संच मिळालेला आहे. त्यामुळे भारताची ‘आयसीसी’ जेतेपदाची प्रतीक्षा लवकरच संपेल, याची मला खात्री आहे. त्याला प्रशिक्षण कारकीर्दीसाठी शुभेच्छा,’’ असा संदेश शास्त्री यांनी द्रविडला दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rohit sharma india have the best option for a twenty20 captaincy akp

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या