Yashasvi Jaiswal On Rohit Sharma: यशस्वी जैस्वालने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात दमदार शतकी खेळी केली होती. हे त्याचं वनडे क्रिकेटमधील पहिलंच शतक ठरलं होतं. जैस्वाल वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी अजूनही नवीन आहे. या फॉरमॅटमध्ये त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. २०२३ मध्ये त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. दरम्यान जैस्वालने कसोटी पदार्पणआधीचा एक किस्सा सांगितला आहे.

जैस्वालला जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. ज्यावेळी यशस्वी जैस्वालने पदार्पण केलं, त्यावेळी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. जैस्वालला पदार्पणाची संधी मिळणार, हे रोहितने १ दिवसाआधी नव्हे, तर १५ दिवसांआधीच सांगितलं होतं.

विमल कुमार या यूट्यूब चॅनेलवर बोलताना यशस्वीने रोहित शर्माचा एक किस्सा सांगितला आहे. जैस्वाल म्हणाला, ” वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी आम्ही बार्बाडोसमध्ये पोहोचलो, आम्ही पहिल्या सामन्यासाठी डॉमिनिकाममध्ये जात होतो तेव्हाच त्यांनी (रोहितने) मला सांगितलं होतं की, मी खेळणार आहे. मला पदार्पणाची संधी मिळणार, याची कल्पना त्यांनी मला १५ दिवसाआधीच दिली होती. तू तयार राहा, आपण एकत्र तयारी करू, असं ते म्हणाले होते.”

तसेच तो पुढे म्हणाला, “हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. कारण मी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार होता. रोहित भाई बद्दल काय बोलावं, शब्दच नाहीत माझ्याकडे. काय व्यक्तिमत्व आहे ते, तो भावासारखा आहे, तो शिकवतो, तो मार्गदर्शनही करतो. त्यांच्याकडून नेहमीच खूप काही शिकायला मिळतं.”

तसेच तो पुढे म्हणाला, “मी स्वतःला खूप नशीबवान आणि धन्य समजतो की मला त्यांच्यासारख्या महान खेळाडूसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची आणि सलामीला येण्याची संधी मिळाली.” वेस्ट इंडिजविरूद्ध खेळताना त्याने पदार्पणातच १७१ धावांची विक्रमी खेळी केली होती. सध्या तो भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज आहे. २०२५ मध्येही त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.