Rohit Sharma Injury Update Marathi News: मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माच्या रूपात एक वाईट बातमी समोर आली आहे. १३ वर्षांनंतर आयपीएल २०२६ मध्ये, संघाने आपला पहिला सामना जिंकून हंगामाची दमदार सुरुवात केली, पण त्यानंतर आता पराभवाची मालिका सुरू झाली आहे. पण केवळ पराभवच नाही, तर आता संघ आपला माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माच्या दुखापतीमुळे अडचणींचा सामना करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर रोहित पुढील सामन्यात खेळणार का, याबाबत साशंकता आहे. यानंतर आता रोहित शर्माला हॉस्पिटमध्ये जावं लागलं आहे.
रविवार, १२ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर आरसीबीविरूद्ध सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्माला दुखापत झाली. पाचव्या षटकात कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर एक धाव घेतल्यानंतर रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत जाणवली. त्यानंतर सहाव्या षटकातही त्याला अधिक वेदना होऊ लागल्या. मुंबई इंडियन्सचे फिजिओ त्याला तपासायला आले, त्यानंतर रिटायर्ड हर्ट होत हिटमॅन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रोहित पुन्हा फलंदाजीला आला नाही.
रोहित शर्माच्या स्कॅनचे रिपोर्ट्स कधी येणार?
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, परंतु त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचं समोर आलं आहे, ज्यामुळे तो फलंदाजी करू शकला नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, दुखापत किती गंभीर आहे हे निश्चित करण्यासाठी रोहितला आता रुग्णालयात जाऊन त्याच्या हॅमस्ट्रिंगची तपासणी करावी लागणार आहे. या सामन्याच्या निकालावर त्यांचा पुढचा सामना अवलंबून असेल. मुंबई आपला पुढचा सामना १६ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध खेळेल. हा सामनादेखील वानखेडे स्टेडियमवरच खेळवला जाईल.
रोहित शर्माचे आज स्कॅन झाल्याची माहिती रेव्हस्पोर्ट्सने आता दिली आहे. आज रात्री १३ एप्रिलपर्यंत रोहित शर्माच्या स्कॅनचे रिपोर्ट्स येणार आहेत. या रिपोर्ट्सनंतर रोहित शर्मा १४ एप्रिलला होणाऱ्या सराव सत्रात सहभागी होऊ शकतो. रोहित शर्माची दुखापत ठिक असल्यास काही फिटनेस ड्रील्स घेतल्या जातील. फिटनेस ड्रील्सचे रिपोर्ट्स जर सकारात्मक आले तरच रोहित १६ एप्रिलला होणारा सामना खेळू शकतो.
आरसीबीविरूद्ध सामन्यात रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्याने १३ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या होत्या. संपूर्ण हंगामाचा विचार करता, त्याने पहिल्या सामन्यात शानदार ८३ धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, पुढील दोन सामन्यांमध्ये त्याला या कामगिरीमध्ये सातत्या राखता आलं नाही. त्याने आतापर्यंत चार डावांमध्ये एका अर्धशतकासह १३७ धावा केल्या आहेत.
