Rohit Sharma Post For T Dilip BCCI Fielding Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी (२ ऑगस्ट) टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी टी. दिलीप यांच्या जागी सुभदीप घोष यांची नियुक्ती केली. बीसीसीआयने दिलीप तसेच रायन टेन डेश्काटे यांचे करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी अद्याप नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यानंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी दिलीप यांच्यासाठी खास स्टोरी शेअर केली आहे.

रोहित शर्मा कर्णधार असताना त्याच्या कार्यकाळात टी दिलीप हे संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने फिल्डिंगमध्ये विशेष प्रगती केली होती. याशिवाय त्यांच्या फिल्डिंग ड्रीलचे विविध व्हीडिओ आपण बीसीसीआयच्या सोशल मीडियावरही पाहिले. तर बेस्ट फिल्डिंग मेडलची सुरूवातही २०२३ मध्ये त्यांच्या कार्यकाळात सुरू झाली. वनडे विश्वचषक २०२३ मध्ये हे फिल्डिंग मेडल सुरू झालं होतं या स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्यादरम्यान चांगली फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूचं नाव विविध माध्यमातून जाहीर करत त्याला हे मेडल सामन्यानंतर देण्यात यायचं.

टी दिलीप यांच्यासाठी खुद्द रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “दिलीप गारू (सर), तुम्ही खरे दिग्गज आहात. तुम्ही संघामध्ये एक वेगळीच जादू निर्माण केली आणि पडद्यामागे राहून अथक परिश्रम करणारे खरे शिलेदार ठरलात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”

Rohit Sharma Instagram Story for Fielding Coach T Dilip

२०२१ मध्ये प्रथमच टीम इंडियासोबत जोडले गेलेले टी. दिलीप यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी एक भावनिक संदेश सोशल मीडियावर शेअर केला. या संदेशात त्यांनी राहुल द्रविड, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर काही खेळाडूंचा उल्लेख करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

टी दिलीप भावुक पोस्ट शेअर करत म्हणाले, “पाच वर्षे… इतक्या अर्थपूर्ण प्रवासासाठी योग्य शब्द शोधणं खरोखर कठीण आहे. जेव्हा मी प्रथम या संघात दाखल झालो, तेव्हा माझ्या मनात एकच साधा हेतू होता, दररोज माझ्याकडून शक्य ते सर्वस्व पणाला लावत संघासाठी काम करणं. क्षेत्ररक्षण हे नेहमीच मला प्रिय असलेल्या या खेळासाठी योगदान देण्याचं माझं माध्यम राहिलं आहे आणि या संघाच्या प्रवासाचा एक भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.

“फिल्डिंग मेडल माझ्या हृदयात कायमचं एक विशेष स्थान राखून राहील. त्या मेडलमुळे ड्रेसिंग रूममध्ये निर्माण झालेला उत्साह, खेळाडूंच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांनी त्याला दिलेलं महत्त्व या सर्व आठवणी मी आयुष्यभर जपून ठेवेन,” असं दिलीप यांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं आहे.