scorecardresearch

“असं वाटलं की विराट कर्णधारपद कधी सोडतोय याची ते वाटच पाहत होते”; रोहित-राहुलवर साधला निशाणा

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनाही विराटचं अभिनंदन केलं होतं.

kl rahul rohit sharma virat kohli
विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर दोघांनाही केलं होतं विराटचं अभिनंदन (फाइल फोटो)

विराट कोहलीने नुकतच भारतीय कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना विराटच्या या निर्णयामुळे धक्का बसलाय. कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीचा संदर्भ देत त्याच्या सहकारी खेळाडूंकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र असं असतानाच पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने एक विचित्र वक्तव्य केलंय. असं वाटतंय की, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल हे विराट कर्णधारपद सोडण्याची वाटच पाहत होते, अशा पद्धतीचं वक्तव्य लतीफने केलंय.

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने त्याचं अभिनंदन केलं होतं. मात्र असं असतानाही पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला विराट कर्णधारपदावरुन पायउतार होण्याची वाट रोहित आणि के. एल. राहुल पाहत होते असं वाटतंय. “विराट कोहली हा जागतिक स्तरावरील खेळाडू आहे. भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असेल? रोहितला प्रकृतीसंदर्भातील समस्या असून त्यामुळेच तो दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण दौऱ्यामध्ये खेळताना दिसला नाही. म्हणजेच रोहित सध्या फारच अनफीट आहे. के. एल. राहुल कर्णधार होण्याच्या पात्रतेचा नाहीय,” असं राशिद लतीफ म्हणालाय.

“मला या खेळाडूंची वागणूक समजत नाही. जर तुम्ही विराट कोहलीला एक चांगला कर्णधार समजता तर तुम्ही त्याचा कर्णधार पद सोडण्याचा निर्णय कसा इतक्या सहजपणे स्वीकारला? हे म्हणजे असं वाटलं की की ते सर्वजण (खेळाडू) वाटत पाहत होती की विराट कधी कर्णधारपद सोडतोय,” असं म्हणत राशिद लतीफने खेळाडूंच्या भूमिकेवर शंका उपस्थित केलीय.

विराटने कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने सोशल नेटवर्किंगवरुन, “धक्कादायक… मात्र भारतीय कर्णधार म्हणून एक यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. विराट तुला पुढील प्रवासासाठी फार फार शुभेच्छा”, असं म्हणत भावना व्यक्त केलेल्या. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये विराटच्या गैरहजेरीमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या के. एल. राहुलने विराट हा खऱ्या अर्थाने नेतृत्व गुण असणारा खेळाडू आहे, असं म्हटलं होतं. तसेच विराटने संघासाठी जे काही केलंय त्याबद्दल राहुलने त्याचे आभार मानले होते.

तसेच राशिद लतीफने विराट आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुलीमध्ये जे काही घडलं ते नव्हतं व्हायला हवं, असंही म्हटलंय. आता विराट मुक्तपणे फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करु शकतो, असंही राशिद लतीफ म्हणालाय. तसेच विराटने कर्णधारपद सोडत बीसीसीआयला चपकार लगावली आहे आणि आता तो आपल्या फलंदाजीने बीसीसीआयला दमदार उत्तर देईल, असा विश्वासही राशिद लतीफने व्यक्त केलाय.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma kl rahul were waiting for virat kohli to quit test captaincy said former pakistan captain rashid latif scsg

ताज्या बातम्या