Team India Playing XI Prediction For IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघ वेस्ट इंडिजचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मालिका खिशात घातल्यामुळे आणि फलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्यामुळे चंदिगढ येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
यशस्वी जैस्वालला संधी मिळणार का?
येत्या ऑक्टोबर २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. गुरूवारी आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतीय संघाने आधीपासूनच या स्पर्धेसाठी संघबांधणी करायला सुरूवात केली आहे. जे फलंदाज मुख्य संघात खेळणार आहेत, त्यांनी आपल्या फलंदाजीतील फॉर्म सिद्ध केला आहे. आता बाकावर बसलेले खेळाडू या आव्हानासाठी सज्ज आहेत की नाही, हे तपासून पाहण्याची गरज आहे.रोहित शर्माचा बॅकअप म्हणून यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ४०६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिलने वादळी सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २५५ धावांची विक्रमी भागीदारी केली. यादरम्यान रोहितने १०१ धावांची शतकी खेळी केली. रोहितने फॉर्म आणि फिटनेस दोन्ही सिद्ध केलं आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याजागी यशस्वी जैस्वालला डावाची सुरूवात करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलची जोडी डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकते.
मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज प्रसिध कृ्ष्णा गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी अंशूल कंबोजला संघात स्थान देण्यात आलं आहे. पण अंशूल कंबोजला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. प्रसिधच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.
