Rohit Sharma Captaincy: आयपीएल स्पर्धेत ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात नावाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. मुंबईला या हंगामातील १० पैकी केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. पण गेल्या सामन्यात लखनौला पराभूत केल्यानंतर, मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. या सामन्यात हार्दिक पंड्या खेळताना दिसून आला नव्हता. तो दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. हार्दिक अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे तो पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. यासह सूर्या देखील पुढील सामन्याला मुकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पुढील सामन्यातून सूर्या बाहेर?

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. हार्दिकच्या जागी मुंबईचं नेतृत्व करत असलेला सूर्यकुमार यादव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सूर्याची पत्नी देविशा शेट्टी लवकरच आई होणार असून, या खास क्षणी सूर्याला तिच्यासोबत राहायचे आहे. त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. पण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त आहे. माध्यमातील वृत्तानुसार तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. मुंबईचा संघ रायपूरला रवाना झालेला आहे. पण हार्दिक संघासोबत दिसून आला नव्हता. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोहित शर्मा कर्णधार होणार?

हार्दिक नसेल, तर सूर्यकुमार यादव नेतृत्व करत होता. पण आता दोघेही नसताना संघाचं नेतृत्व कोण करणार? अशी चर्चा रंगली आहे. या शर्यतीत रोहित शर्माचं नाव सर्वात पुढे आहे. कारण त्याच्याकडे संघाचं नेतृत्व करण्याचा चांगलाच अनुभव आहे. यासह सध्या मुंबई इंडियन्स संघात असा कुठलाही खेळाडू नाही, जो कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. मुंबईची सध्याची गुणतालिकेतील स्थिती पाहता, प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे रोहित या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसू शकतो.