देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस

Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027 Update: मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये आयपीएल २०२७ पूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. नवीन प्रशिक्षक आणि कोचिंग स्टाफनंतर आता कर्णधारपदाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्स आगामी आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहितला पुन्हा कर्णधार बनवण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत.

गेल्या आठवडाभरात फ्रँचायझीने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये केलेल्या मोठ्या बदलांनंतर हा निर्णय अपेक्षित मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब होत असताना हार्दिक पंड्याकडून कर्णधारपद काढून ते रोहित शर्माकडे सोपवण्याचा विचार फ्रँचायझीने केला होता. पंड्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबईने आधीच घेतला होता. मात्र, त्याच्या जागी नेमकी कोणाची निवड करायची, हा प्रश्न व्यवस्थापनासमोर होता.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने १४ पैकी १० सामने गमावले होते. संघाला गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. याचबरोबर मुंबईचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ सहा वर्षांपर्यंत वाढला होता. त्यामुळे कर्णधार बदलण्याचा निर्णय जोर धरून होता.

दरम्यान, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही संघाचा बराच काळ भाग असल्याने त्यांच्याकडेही नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याचा पर्याय मुंबईसमोर होता. याशिवाय, युवा फलंदाज तिलक वर्माचाही कर्णधारपदासाठी विचार होऊ शकत होता. भविष्यातील संघबांधणी लक्षात घेऊन एखाद्या युवा खेळाडूला नेतृत्वाची संधी देण्याचा विचार फ्रँचायझी करू शकत होती. मात्र, आता रोहित शर्माकडेच पुन्हा कर्णधारपद सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फ्रँचायझीशी संबंधित एका सूत्राने सांगितलं, “रोहितने सुरुवातीला तिलक वर्माच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, फ्रँचायझीने रोहितलाच पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यानेही त्याला होकार दिला आहे. न्यूझीलंडसाठी रवाना होण्यापूर्वी याबाबत अनेकदा चर्चा झाली होती. नव्या प्रशिक्षकांच्या नियुक्तीवेळीही रोहितचं मत विचारात घेण्यात आलं होतं.”

गेल्या आठवड्यात पुढील आयपीएल हंगामात रोहित मुंबईचे नेतृत्व करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुंबई इंडियन्सच्या एका सूत्राने सांगितलं हों, “सध्या या केवळ चर्चा आहेत. ट्रेड विंडो आणि रिटेन्शनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. फक्त एका हंगामासाठीच कर्णधारपद देण्याचा विचार का केला जात आहे? रोहित अजूनही क्रिकेट खेळत आहे आणि जोपर्यंत त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळायचं आहे, तोपर्यंत तो खेळत राहील.”

रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर आता हार्दिक पंड्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेल्या हंगामापासून हार्दिकचं नाव ट्रेड डीलच्या माध्यमातून इतर फ्रँचायझींशी जोडलं जात आहे. मात्र, हार्दिकचा ट्रेड झाला नाही, तर रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यास त्याने सहमती दर्शवल्याचं समजतं.