रोहित शर्माने २००७ मध्ये आयर्लंड दौऱ्यात पदार्पण केलं. राहुल द्रविडच्या नेतृत्वात रोहितला वनडे कॅप देण्यात आली. या घटनेला आता जवळपास २० वर्ष होत आली आहेत. रोहित आता चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. आज तो इंग्लंडविरुद्ध २८८वा वनडे सामना खेळत आहे. या प्रकारात त्याच्या नावावर ११७५७ धावा असून यामध्ये ३३ शतकं आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावण्याचा अनोखा विक्रम त्याच्या नावावर आहे. वनडे क्रिकेटमधल्या सार्वकालीन अव्वल खेळाडूंमध्ये रोहितचा समावेश होता. सलामीवीर म्हणून रोहित भारतीय संघाचा आधारस्तंभ झाला. जाणून घेऊया रोहितने वनडे पदार्पण केलं त्या सामन्यातले खेळाडू आता काय करतात.
बेलफास्टमधल्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या मुकाबल्यात भारताने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर आयर्लंडचा डाव १९३ धावातच आटोपला. ढगाळ, मळभ असलेल्या वातावरणात चेंडू चांगला स्विंग होत होता. त्याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी उठवला. आयर्लंडतर्फे निआल ओ ब्रायनने सर्वाधिक ५२ धावा केल्या. ट्रेंट जॉन्स्टनने ३४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे श्रीसंत आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना, सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने ९ विकेट्स राखून लक्ष्य गाठलं. डकवर्थ लुईस पद्धतीमुळे लक्ष्य कमी झालं होतं. गांगुलीने ९९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७३ तर गंभीरने १०७ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ८० धावांची खेळी केली.
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी काही काळ समालोचन केलं. त्यानंतर ते आयपीएल स्पर्धेतल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे मेन्टॉर होते.
सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्स संघाशी संलग्न आहेत. अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतात.
गौतम गंभीर यांनी निवृत्तीनंतर सामाजिक कामात सहभाग घेतला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मात्र राजकारणातून बाजूला होणं पसंत केलं. आयपीएलमध्ये विविध संघांचं प्रशिक्षकपद भूषवलेले गंभीर सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आयसीसी स्पर्धांमध्ये गंभीरच्या मार्गदर्शनात खेळणाऱ्या भारतीय संघाने चांगली कामगिरी केली असली तरी दोन देशांदरम्यानच्या लढतींमध्ये भारतीय संघाची कामगिरी सर्वसाधारण राहिली आहे.
रोहित शर्माचे पहिले कर्णधार राहुल द्रविड यांनी निवृत्तीनंतर राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षकपद भूषवलं. ते बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख होते. इंडिया अ संघाचे प्रशिक्षक म्हणून पाहिलं. त्यानंतर राहुल भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने २०२४ टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं.
युवराज सिंगने निवृत्तीनंतर एक हॉटेल सुरू केलं आहे. अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग यासारख्या प्रतिभावान खेळाडूंना युवराज मार्गदर्शन करतो.
रोहित शर्माचा खास मित्र दिनेश कार्तिक समालोचन करतो. अनेक वर्षांचा खेळण्याचा अनुभव त्याला बोलताना उपयोगी ठरतो. खेळाडूंचे किस्से तसंच तांत्रिक बारकावे यामुळे भारत नसलेल्या सामन्यांनाही कार्तिक समालोचनाला असतो.
अजित आगरकर हे निवडसमितीचे प्रमुख आहेत. रोहित शर्माला वनडे पदार्पण करताना त्यांनी पाहिलं आहे. आता रोहित शर्मा पुढच्या वर्षी वर्ल्डकप खेळणार का हा निर्णय अजित यांच्या नेतृत्वातील निवडसमितीच्या हातात आहे.
आरपी सिंगने हिंदी समालोचनानंतर निवडसमिती सदस्य झाला आहे. रोहितचं भवितव्य ज्या मंडळींच्या हातात आहे त्यात आरपी सिंगचा समावेश आहे.
पीयुष चावला निवृत्तीनंतर समालोचन करू लागला. सध्या तो श्रीलंकेत सुरू असलेल्या लंका प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळत आहे.
श्रीसंतवर आयपीएल स्पर्धेत स्पॉटफिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आली होती. ऑगस्ट २०१९ मध्ये ही बंदी कमी करून सात वर्षांपुरती झाली. २०१८ मध्ये तो बिग बॉस कार्यक्रमात सहभागी झाला होता. २०२० मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. २०२२ मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २००७ टी२० वर्ल्डकपविजेत्या आणि २०११ वनडे वर्ल्डकपविजेत्या संघाचा श्रीसंत अविभाज्य घटक होता. आता तो समालोचन करतो. माजी खेळाडूंसाठी असलेल्या लिजंड्स लीग स्पर्धेत खेळतो.
