रोहित शर्माने भारतीय टी-२० संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७ विकेटने पराभव केला. यासह संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात रोहित शर्माने ५५ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १७.२ षटकांत लक्ष्य गाठले. केएल राहुलनेही अर्धशतकी खेळी खेळली. या सामन्यात रोहितने एक नव्हे, दोन नव्हे, तर सहा मोठे विक्रम केले.

२९व्यांदा ५० पेक्षा जास्त धावा

या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने २९व्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. हा एक विक्रम आहे. विराट कोहलीनेही सर्वाधिक २९ वेळा हा पराक्रम केला आहे. रोहितने ४ शतके आणि २५ अर्धशतके केली आहेत. कोहलीला आतापर्यंत एकही शतक झळकावता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम रोहितच्या नावावर आहे.

शतकी भागीदारी

या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुलने शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या दोघांची ही ५वी शतकी भागीदारी आहे. हा देखील एक विक्रमच आहे. बाबर आझम आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान यांनीही जोडी म्हणून सर्वाधिक ५ वेळा शतकी भागीदारी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकार

या सामन्यात रोहित शर्माने ५ षटकार ठोकले. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५४ षटकार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकार मारणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. जगातील केवळ तीन खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. रोहितपूर्वी विंडीजच्या ख्रिस गेल आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनेही ही कामगिरी केली आहे.

संघाच्या विजयात रोहित

रोहित शर्मा ५० पेक्षा जास्त धावा करून संघाला २५व्यांदा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने तीन वेळा शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत. जगातील इतर कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली २० वेळा हा पराक्रम करून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – Fan Moment! रोहितसाठी ‘तो’ धावत मैदानावर पोहोचला, पायाला हात लावणार इतक्यात…; पाहा VIDEO

भागीदारीत विक्रम

रोहित शर्माने १३ वेळा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळाडू म्हणून १०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. हा देखील एक विक्रमच आहे. त्याने केएल राहुलसोबत ५ वेळा, शिखर धवनसोबत ४ वेळा, विराट कोहलीसोबत ३ वेळा आणि सुरेश रैनासह एकदा १०० हून अधिक धावा जोडल्या आहेत.

भारतीय कर्णधार म्हणून विक्रम

रोहित शर्मा हा घरच्या मैदानावर सर्वात कमी सामन्यांमध्ये १० विजय मिळवणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने घरच्या मैदानावर ११ पैकी १० टी-२० सामने जिंकले आहेत. विराट कोहली आणि धोनीला अशी कामगिरी करण्यासाठी १५ हून अधिक सामने खेळावे लागले.