India Squad for Afghanistan Series Update: आयपीएल २०२६ नंतर भारतीय क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाचे संघ मंगळवारी गुवाहाटी येथे जाहीर केले जातील. निवड समितीच्या बैठकीपूर्वी अनेक महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. काही खेळाडूंना संघातून वगळलं जाईल, तर काहींचे भवितव्य बदलणार असल्याचं वृत्त आहे. रोहित शर्माच्या बाबतीतही एक वाईट बातमी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. यातील पहिलं नाव मोहम्मद सिराज आहे, जो अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दिसू शकतो. सिराजने आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि तो सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त, मोहम्मद शमीच्या कसोटी संघात पुनरागमनाचेही वृत्त आहे. या खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली असून त्याचा फिटनेस सुधारत असल्याचं दिसत आहे.
संजू सॅमसनला मिळणार मोठं बक्षीस
संजू सॅमसनलाही एक मोठं बक्षीस मिळणार आहे. टी-२० विश्वचषकातील मॅचविनिंग कामगिरीनंतर सॅमसनने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली असून आता हा खेळाडू एकदिवसीय संघात पुनरागमन करणार आहे. ऋषभ पंतला एकदिवसीय संघातून वगळले जाऊ शकते, असं वृत्त समोर आलं आहे. तर ऋषभ पंतकडून कसोटी उपकर्णधारपद काढून घेतलं जाण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये ६० बळी घेणाऱ्या जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. वृत्तानुसार, त्याची आणि गुरनूर ब्रारची निवड होण्याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. पण रोहित शर्माबाबत तर धक्कादायक माहिती समोर येत आहे.
रोहित शर्माला टीम इंडियातून का वगळणार?
निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या फिटनेसवर चर्चा होणार असून त्यांनी वगळण्यात येणार असल्याची अशी चर्चा आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माला आयपीएलचे काही सामने खेळता आले नाहीत. शिवाय, तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे. प्रश्न असा आहे की, रोहित ५० षटकांच्या फॉरमॅटसाठी फिट आहे का? जर रोहित शर्मा फिट नसेल तर त्याची निवड होणार नाही.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या तंदुरुस्तीबद्दलही चर्चा सुरू आहे. या आयपीएल हंगामात हा खेळाडू दुखापतीमुळे काही सामने खेळू शकलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तो तंदुरुस्त असेल तरच त्याची निवड केली जाईल.
