Rohit Sharma Mumbai Indians Captaincy Rumors IPL 2027 Truth: मुंबई इंडियन्स संघाला विक्रमी पाच वेळा आयपीएलचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. रोहितला पुन्हा कर्णधारपद मिळणार या चर्चा सुरु होताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडिया तर पोस्ट, व्हिडीओचा जणू पाऊस पडला आहे. पण रोहित खरंच पुन्हा कॅप्टन होणार का? जाणून घेऊया.
रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पुन्हा सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चांना फ्रँचायझीच्या सूत्रांनी पूर्णविराम दिला आहे. NDTVने दिलेल्या माहितीनुसार, या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी सांगितलं. आगामी आयपीएल हंगामासाठी कर्णधारपदाबाबत अद्याप फ्रँचायझीमध्ये कोणतीही अंतर्गत चर्चा झालेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला ट्रेड करण्याचा विचार करत असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हार्दिकने आयपीएल २०२७पूर्वी संघ सोडल्यास रोहित शर्माचा विचार न करताही मुंबईकडे कर्णधारपदासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, हार्दिक पंड्याला ट्रेड करण्यासाठी अद्याप कोणताही योग्य प्रस्ताव मिळालेला नसल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं.
रोहित शर्मा नाहीतर कोण आहेत मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठीचे दावेदार?
हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यास सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे कर्णधारपदासाठी आघाडीचे दावेदार असतील. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर याचाही या शर्यतीत समावेश आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २०२६चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. मात्र, स्पर्धेनंतर लगेचच त्याला कर्णधारपद आणि संघातील स्थानही गमवावं लागलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने यश मिळवलं असलं, तरी फलंदाजीतील खराब फॉर्ममुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे, तिलक वर्मा हा भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा असून, त्याने मुंबई इंडियन्सच्या संघातील आपलं स्थान पक्कं केलं आहे. तो भारतीय टी-२० संघाचाही उपकर्णधार आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरनेही आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. विशेष म्हणजे, तो न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या संघांचं नेतृत्वही करतो.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना संघाला पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं. मात्र, आयपीएल २०२४पूर्वी त्याच्या जागी हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं. मात्र, मुंबई इंडियन्सला हार्दिकच्या नेतृत्वाखाली अपेक्षित यश मिळवता आलं नाही. आयपीएल २०२४मध्ये संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहिला. पुढील हंगामात मुंबईने क्वालिफायर-२पर्यंत मजल मारली; मात्र आयपीएल २०२६मध्ये संघाला नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
