भारताचा कर्णधार रोहित शर्मा गुणी फलंदाज आहे. त्याने खेळपट्टीवर टिकून राहून मोठी खेळी करण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याची खेळपट्टीवरील उपस्थिती भारतासाठी खूप प्रभाव पाडू शकते असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार रोहितने वेगवान सुरुवात करण्याचा दृष्टिकोन अवलंबला आहे. पण, या प्रयत्नांत तो अनेकदा लवकर बाद झाला आहे. त्याने वेगवान पवित्रा घेण्यात चूक काहीच नाही. पण, संघाचे हित लक्षात घेता त्याने खेळपट्टीवर अधिक वेळ टिकणे महत्त्वाचे आहे, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

रोहितने २५ षटके फलंदाजी केली, तर भारताची धावसंख्या १८० ते २०० च्या घरात येईल. तेव्हा जर दोनच गडी बाद झाले असतील तर, अशा वेळी भारत ३५० च्या आसपास मजल निश्चित मारू शकेल, असे गावस्कर यांनी नमूद केले.

‘‘वेगवान फलंदाजी करणे हा एक भाग झाला. पण, त्याने अशा वेळी स्वत:ला अधिक काळ खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. रोहित जेव्हा असा संयम बाळगतो, तेव्हा सामना प्रतिस्पर्ध्याच्या हातून गेलेला असतो,’’ असे गावस्कर यांचे म्हणणे आहे.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील ४१ धावांची खेळी सर्वाधिक आहे. पाकिस्तानविरुद्ध २०, न्यूझीलंडविरुद्ध १५ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८ धावा केल्या आहे. रोहितसारख्या फलंदाजांनी २५ ते ३० धावसंख्येवर समाधान मानून उपयोगी नाही. तो अधिक षटके किंवा अगदी २५ षटके जरी मैदानात टिकला तरी त्याचा डावावर मोठा प्रभाव पडेल, असे गावस्कर यांनी सांगितले.

न्यूझीलंडकडे जिंकण्याची क्षमता हुसेन

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारतविरुद्ध न्यूझीलंड सामना रोमांचकारी होईल असे मत व्यक्त करताना न्यूझीलंडकडे जिंकण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंड संघ हार मानणारा नाही. त्यांच्याकडे दमदार क्रिकेटपटू आहेत. दबावाखाली ते न डगमगता खेळतात, असेही हुसेन म्हणाले. ‘‘न्यूझीलंड संघाकडे क्षमता आहे आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांच्याकडे वचनबद्धता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ‘आयसीसी’च्या प्रत्येक स्पर्धेत ते उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीपर्यंत पोहोचतात,’’ असेही हुसेन यांनी सांगितले.