निवृत्तीच्या चर्चा सुरू असतानाच हिटमॅन रोहित शर्माने क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवर सुरेख खणखणीत खेळी साकारली. लॉर्ड्सच्या मैदानावर शतकी खेळी साकारणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला. या शतकी खेळीसह इंग्लंडमध्ये वनडेत सर्वाधिक शतकं झळकावणारा विदेशी फलंदाज हा मान रोहितने पटकावला आहे.

२०११ पासून इंग्लंडमध्ये खेळत आहे. इंग्लंडच्या भूमीवर पहिल्या शतकासाठी रोहितला ६ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. २०१७ मध्ये रोहितने बांगलादेशविरुद्ध बर्मिंगहॅम इथे शतक झळकावलं. बांगलादेशने भारताला २६५ धावांचं लक्ष्य दिलं होतं. रोहितच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने ९ विकेट्स राखून विजय मिळवला होता.

पुढच्याच वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात रोहितने यजमानांविरुद्ध शतक पूर्ण केलं. इंग्लंडने दिलेलं २६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने नाबाद १३७ धावांची खेळी केली. या खेळीत १५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेला वनडे वर्ल्डकप रोहितसाठी स्वप्नवत ठरला. दक्षिण आफ्रिकेसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध रोहितने १२२ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. बाकी फलंदाज धावांसाठी संघर्ष करत असताना रोहितने जबरदस्त फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

काही दिवसांनंतर हिटमॅनने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दणका दिला. रोहितच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं लक्ष्य ठेवलं. रोहितने १४ चौकार आणि ३ षटकारांसह १४० धावांची खेळी केली. उत्तम फॉर्म कायम राखत रोहितने यजमानांविरुद्ध शतक झळकावलं. ३३८ धावांचा पाठलाग करताना रोहितने १०२ धावांची खेळी केली मात्र संघाच्या विजयासाठी ती अपुरी ठरली. रोहितने या खेळीत १५ चौकार लगावले.

बांगलादेशला रोहितच्या बॅटचा तडाखा बसला. रोहितने सख्खे शेजाऱ्यांविरुद्ध १०४ धावांची खेळी साकारली. भारताने हा सामना जिंकला. रोहितला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. वर्ल्डकप स्पर्धेतलं विक्रमी पाचवं शतक रोहितने श्रीलंकेविरुद्ध केलं. त्याने या लढतीत ९४ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. या सामन्यात रोहित-राहुल जोडीने १८९ धावांची दमदार सलामी दिली. भारताने हा सामना जिंकला.

एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधित शतकांचा विक्रम रोहितने नावावर केला. वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधित शतकांचा (७) विक्रम रोहितच्या नावावर आहे. इतकी वर्ष इंग्लंडमध्ये खेळत असूनही रोहितचं लॉर्ड्सवर शतक नव्हतं. अनेक वर्ष सातत्याने खेळत असूनही भारतीय फलंदाजाला लॉर्ड्सवर शतक झळकावता आलं नव्हतं. लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर झळकण्याचा मान रोहितला मिळेल.

मळभ, ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग होतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये खेळणं कठीण असतं. सलामीवीरांना नव्या चेंडूचा सामना करावा लागतो. त्यामुळे जबाबदारी अधिकच वाढते. रोहितने इंग्लंडमध्ये वनडेत कशी फलंदाजी करावी याचा वस्तुपाठच सादर केला.

रविवारी इंग्लंडने दिलेल्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने सावध सुरुवात केली. मात्र खेळपट्टीचा अंदाज आल्यावर रोहितने भात्यातले सगळे फटके परजत शतक झळकावलं. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहितला निवडसमितीने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप योजनांचा भाग नाही असं सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. बीसीसीआय सचिवांना अशा बातम्यांचं खंडन करत रोहित भारतीय संघाचा अविभाज्य घटक असल्याचं स्पष्ट केलं. लॉर्ड्स वनडे रोहितची भारतासाठीची शेवटची वनडे नसेल हेही स्पष्ट केलं.