देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस

Lords ODI Could Be Rohit Sharma’s Last Match for India: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा व अखेरचा वनडे सामना १९ जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. लॉर्ड्सवरील वनडे सामना हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालातून समोर आली आहे.

अहवालानुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने इंग्लंड दौऱ्यानंतर रोहित शर्मापासून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत त्याला आधीच माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत निवड समितीने रोहितशी चर्चा करत भविष्यातील योजना स्पष्ट केल्याचं समजत आहे. निवड समिती आता यशस्वी जैस्वालसारख्या युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याच्या तयारीत असून, २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या योजनांमध्ये रोहित शर्माचा विचार केला जात नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

रोहित शर्माला भारताच्या वनडे विश्वचषक २०२७च्या प्लॅनचा भाग नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) एका सूत्राने सांगितल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे की, “इंग्लंड दौऱ्यानंतरच्या योजनांमध्ये रोहितचा समावेश नसल्याची माहिती निवड समितीने त्याला दिली आहे. रोहितला मात्र विशेषतः फिटनेसवर मेहनत घेतल्यानंतर वनडे क्रिकेट सुरू ठेवायचं होतं. आता त्याच्या भवितव्याचा अंतिम निर्णय पूर्णपणे रोहितवर सोपवण्यात आला आहे.” ही माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालावर आधारित असून, बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अहवालानुसार, इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहित शर्माने बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. निवड समितीच्या निर्णयावर तो समाधानी नसल्याचं समजत आहे.

रोहितने २९ जून २०२४ रोजी भारताला टी-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर काही तासांतच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर ७ मे २०२५ रोजी इंग्लंड दौऱ्यापूर्वी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटलाही रामराम केला. रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेटचं भवितव्य लक्षात घेऊन युवा खेळाडूंना तयार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शतक झळकावूनही यशस्वी जैस्वालसारख्या खेळाडूंना बाकावर बसावं लागलं, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

याचबरोबर, गेल्या वर्षी रोहितकडून वनडे संघाचं कर्णधारपदही काढून घेत शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ च्या वनडे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. त्या स्पर्धेत भारताने अवलंबलेल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने वनडे क्रिकेटमध्ये संघाची नवी ओळख निर्माण केली. त्यानंतर २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने याच आक्रमक शैलीच्या जोरावर विजेतेपद पटकावलं.