Rohit Sharma ODI retirement reasons and futuretransition details: भारतीय क्रिकेटमधील रोहित शर्माचा पर्वाचा शेवट लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होण्याची शक्यता आहे. १९ जुलैला भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना रोहितच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असल्याची शक्यता रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळण्याची आशा बाळगणाऱ्या या अनुभवी फलंदाजाला त्यापूर्वीच आपला प्रवास थांबवावा लागणार आहे. पण रोहित शर्माला संघातून वगळण्यामागे काय कारणं आहेत जाणून घेऊया.
१९ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा रोहित शर्माचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. वृत्तांनुसार, निवड समिती आणि टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने रोहित शर्माला कळवलं आहे की, त्याला दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पुढील वर्षीच्या विश्वचषकात संधी दिली जाणार नाही; त्यामुळेच लॉर्ड्सवरील हा एकदिवसीय सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. पण अचानक असं काय घडलं की ज्यामुळे इतक्या दिग्गज खेळाडूला २०२७ च्या विश्वचषक संघातून वगळण्यात येत आहे, पाहूया काही कारणं
१. रोहित शर्माचं वय आणि संघातील ट्रान्झिशन
रिपोर्ट्सनुसार, २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या योजनांमधून रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे भारतीय क्रिकेट संघात दीर्घकालीन बदल (Long-term Transition) घडवून आणण्यावर बीसीसीआयचा भर असल्याचं सांगितलं जात आहे. २०२७ मध्ये विश्वचषक होईल तेव्हा रोहित शर्मा ४० वर्षांचा असेल. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने भविष्याचा विचार करून तरुण आणि अधिक तंदुरुस्त खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
२. रोहित शर्माचा फॉर्म
रोहित शर्माच्या निवृत्तीचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा ‘फॉर्म’. एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. इंग्लंडमधील दोन सामन्यांत अपयशी ठरण्यापूर्वीही त्याची कामगिरी निराशाजनकच राहिली होती; या वर्षात त्याने आठ डावांमध्ये केवळ ३०.१२ च्या सरासरीने २४१ धावा केल्या आहेत. त्याच्या ‘स्ट्राइक रेट’मध्येही सातत्याने घट झाली आहे. कर्णधार असताना तो ‘पॉवरप्ले’मध्ये १२० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा करायचा; मात्र, कर्णधारपद सोडल्यानंतर विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याचा स्ट्राइक रेट ९० पेक्षा कमी राहिला आहे.
३. रोहितचा उत्तराधिकारी ठरलेला
रोहित शर्माचा जागी पर्यायी खेळाडूदेखील तयार असल्याने रोहितला बाजूला केल्यास संघावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं निवडकर्त्यांचं मत आहे. यशस्वी जैस्वालसारख्या सलामीवीराचा संघाकडे पर्याय आहे, ज्याने सहा एकदिवसीय सामन्यांत आधीच दोन शतकं झळकावली आहेत आणि त्याची सरासरी ७० हून अधिक आहे. त्याच्याव्यतिरिक्त, संघात इशान किशनचाही समावेश आहे, ज्याने या वर्षी एकदिवसीय संघात पुनरागमन केलं. त्याने ४५ हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि एकदिवसीय सामन्यांत द्विशतकही नोंदवलं आहे. विशेष म्हणजे, तो यष्टिरक्षकही आहे आणि दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकात नियमित यष्टिरक्षक म्हणून खेळू शकतो.
