Rohit Sharma Retirement From International Cricket: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. टी-२० मालिका ४- ० ने गमावल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकेत दमदार पुनरागमन केलं. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीत आली आहे. मालिकेतील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. हा सामना आणखी एका कारणामुळे खास ठरणार आहे. ते म्हणजे हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. पण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यादरम्यान रोहितचे आई – वडील लंडनमध्ये दाखल झाल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

CREX च्या वृत्तानुसार, रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा सुरु असताना त्याचे आई – वडील तिसरा वनडे सामना पाहण्यासाठी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. इतरवेळी रोहितचे आई – वडील सामना पाहण्यासाठी मैदानात येत नाहीत. याआधी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील विजयाच्या जल्लोषादरम्यान रोहितच्या आई – वडिलांना वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली होती. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या स्टँडच्या ओपनिंगदरम्यान देखील त्याच्या आई – वडिलांनी हजेरी लावली होती. आता रोहितला शेवटच्या सामन्यात खेळताना पाहण्यासाठी त्याचे आई – वडील लंडनमध्ये दाखल झाल्याची चर्चा रंगली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावरील सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार, याची कल्पना त्यांना आधीपासूनच होती, असं म्हटलं जात आहे.

रोहित शर्मा फलंदाजीत हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात तो अवघ्या ११ धावा करुन माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला अवघ्या २६ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार खेचला. तो केवळ याच मालिकेत फ्लॉप ठरलेला नाही. याआधी झालेल्या ८ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ३३ च्या सरासरीने २४१ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याने ८८.६ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. रोहित जलदगतीने धावा करण्यासाठी ओळखला जातो. पण त्याचा हा स्ट्राइक आता रेट त्याच्या निवृत्तीचं कारण बनला आहे.

रोहितच्या जागी कोणाला संधी मिळणार?

टीम मॅनेजमेंटने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी संघबांधणी करायला सुरुवात केली आहे. रोहित या सेटअपचा भाग नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आता रोहितसमोर निवृत्तीशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका झाल्यानंतर भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालची जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते.