भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. याआधी त्याने तयारीही सुरू केली आहे. रोहितने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे कर्णधार बनल्यानंतर रोहितचा हा पहिला व्हिडिओ आहे, जो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रोहित शर्माने शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘३, २ आणि १… बस सुरुवात करत आहोत.’ या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे ७ लाख युजर्सनी लाइक केले आहे. इतकेच नाही तर या व्हिडिओवर ५६०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओमध्ये रोहित फलंदाजीचा सराव करत आहे आणि त्याच्यासमोर कोच थ्रोडाउनसह वेगवान चेंडू टाकत आहेत. यातील एका चेंडूवर रोहित स्ट्रेट ड्राइव्ह खेळतो, ते पाहून कोचही स्तब्ध झाले. इतकेच नव्हे, तर त्याला टाळ्या वाजवून दादही दिली.

हेही वाचा – अशी चूक पुन्हा होणे नाही..! कॅप्टन बनताच रोहितनं लक्षात आणून दिली ‘ही’ बाब; म्हणाला, ‘‘…त्यामुळेच भारत हरत होता!”

रोहितने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि भारताला ३-० ने विजय मिळवून दिला. मालिकेतील पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेने जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून संघात परतला. आता विराट कोहलीऐवजी वनडे संघाची कमानही रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारणार आहे.