Rohit sharma Vada Pav viral video: रोहित शर्माचे जयपूरमधील विजय हजारे ट्रॉफी खेळतानाचे अनेक व्हीडिओ-फोटो व्हायरल होत आहेत. मुंबईचा विजय हजारे ट्रॉफीमधील सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झाला. रोहितला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांनी भरपूर गर्दी केली होती. रोहित-रोहितच्या घोषणांनी जयपूरचं स्टेडियम दणाणून गेलं होतं. यादरम्यान चाहत्याने रोहितला वडापाव खाणार का असा प्रश्न विचारला, ज्यावर त्याने रोहितने चाहत्यांना मैदानातून उत्तर दिलं, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

रोहित शर्माने जवळपास आठ वर्षांनंतर विजय हजारे स्पर्धेत पुनरागमन केलं. बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सिक्कीमविरुद्ध मुंबईच्या दणदणीत विजयात रोहितने आपल्या कामगिरीसह सर्वांची मनं जिंकली. मुंबईच्या विजयात रोहितने अवघ्या ९४ चेंडूंमध्ये १५५ धावा ठोकण्यापूर्वी, सिक्कीमच्या डावात सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करतानाच्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना स्टेडियममध्ये ‘रोहित, रोहित’च्या घोषणा सुरू होत्या. २०१६ नंतर मुंबईकडून विजय हजारे करंडकात प्रथमच मैदानात उतरलेल्या रोहितला पाहण्यासाठी जवळपास २० हजार प्रेक्षक उपस्थित होते. या गोंगाटातच एका चाहत्याने मिश्किलपणे मोठ्याने रोहितला विचारलं, “वडापाव खाणार का?” यावर रोहितने हसत हाताची अॅक्शन करत नम्रपणे नकार दिल्याचा इशारा केला. हा छोटासा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वडापाव खाणार का, विचारणाऱ्या चाहत्याला रोहितचं चालू सामन्यात दिलं उत्तर

रोहितने चाहत्याच्या प्रश्नाला मैदानावरून दिलेल्या उत्तराने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. रोहित शर्माचा ‘वडापाव’ म्हणून सोशल मीडियावर उल्लेख केला जातो. अनेक चाहत्यांच्या मते, हा प्रसंग रोहितचं मुंबईच्या संस्कृतीशी आणि जीवनशैलीशी असलेलं घट्ट नातं अधोरेखित करतो. रोहित मुंबईचा असल्याने आणि एकंदरीत त्याच्या पूर्वीच्या शरीरयष्टीवरून त्याला चाहते वडापाव म्हणून संबोधतात. पण टी-२० कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर वनडेमध्ये कायम खेळत राहण्यासाठी रोहितने तब्बल १० किलो वजन घटवलं.

रोहितने वजन घटवल्यानंतरही तो त्याच्या आहाराबाबत खूप लक्ष ठेवून आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेदरम्यान केक कापल्यानंतर यशस्वी जैस्वालने विराटला केक भरवला, त्यानंतर विराटने रोहितला केक खाण्यासाठी आग्रह केला. हे ऐकताच रोहित लगेच म्हणाला, “अरे नको केक मी पुन्हा वजन वाढेल.” रोहितचा हा व्हीडिओदेखील तेव्हा व्हायरल झाला होता.

रोहितने वजन घटवल्यानंतरचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रोहितने त्याचा मित्र अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली डाएट करत आणि जिममध्ये घाम गाळत स्वत:ला एकदम फिट बनवलं. रोहितचा हा बदलेला लुक पाहून चाहतेही चकित झाले होते. यासह रोहित सध्या चांगल्या फॉर्मात असून खोऱ्याने धावा करत आहे.