Rohit Sharma Reaction on His Mimicry Video: भारताला सलग दोन आयसीसीची जेतेपद पटकावून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. रोहित शर्माने स्वत:ची नक्कल पाहून भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. रोहित टी-२० मुंबई लीग स्पर्धेच्या लाँच सोहळ्यासाठी उपस्थित होता. हिटमॅन टी-२० मुंबई लीग स्पर्धेचा ब्रँड अम्बेसेडरदेखील आहे. या स्पर्धेपूर्वीच्या कार्यक्रमादरम्यानचा रोहितचा हा व्हीडिओ आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ चा ब्रँड अम्बेसेडर असलेला रोहित शर्मा आता अजून एका स्पर्धेचा ब्रँड अम्बेसेडर असणार आहे. भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्मा आयसीसीचा ब्रँड अम्बेसेडर होता. टी-२० विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा भारताच्या सर्वच सामन्यांसाठी विशेष उपस्थित होता. सामन्यापूर्वी संघाला भेटून त्यांना शुभेच्छा देणं, मोटिव्हेट करतानाचे व्हीडिओ फोटो आपण पाहिले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाचा अंतिम सामना पाहण्यासाठी धोनी व रोहित यांचा एकत्र फोटो तर चाहत्यांसाठी सुवर्णयोग होता.
टी-२० विश्वचषक २०२६ नंतर हिटमॅन कुटुंबासह सहलीला गेला होता. मालदीवमधील सहलीचे फोटो, व्हीडिओ रोहितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सहलीवरून परतल्यानंतर रोहित शर्मा टी-२० मुंबई लीगच्या लाँचसाठी पोहोचला होता. रोहित शर्मासह यावेळेला महिला क्रिकेटपटू सायली सतघरेदेखील उपस्थित होती.
रोहित शर्माने स्वत:ची नक्कल पाहून अशी दिली प्रतिक्रिया
रोहित शर्मा, सायली सतघरे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर मंडळींनी स्पर्धेची ट्रॉफी रिव्हिल केली. मुंबई टी-२० लीगचं हे चौथं वर्ष असणार आहे. आयपीएल व भारतासाठी अनेक नवे चेहरे समोर आणण्याचं काम ही स्पर्धा करत आहे. या कार्यक्रमादरम्यान रोहित शर्मा समोर उपस्थित होता.
प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट शारंग श्रृंगारपुरे यांनी रोहित शर्मासमोर त्याची नक्कल केली. शारंग यांनी रोहित शर्माची नक्कल करण्यासाठी त्याचं नाव घेताच रोहितने लगेच त्याच्यादिशेने हात वर केला आणि हसायला लागला. यानंतर रोहित शर्माचे काही फेमस वाक्य म्हणत त्यांची नक्कल केली. रोहित संपूर्ण नक्कल होईपर्यंत हसताना दिसत होता. यानंतर त्याने नक्कल पूर्ण केल्यानंतरही रोहित खळखळून हसत टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं.
रोहित शर्मा आता आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार आहे. २८ मार्चपासून आयपीएलला सुरूवात होत आहे आणि रविवारी २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्स स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. यानंतर रोहित शर्मा व टीम इंडिया २०२७च्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने सरावाला सुरूवात करतील.
