Rohit Sharma Reaction on jasprit bumrah being hit: मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियममध्ये सलग चौथ्या पराभवाला यंदा सामोरं जावं लागलं. हैदराबादविरूद्ध मोठ्या धावसंख्येच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी फारच निराशाजनक कामगिरी केली. तर जसप्रीत बुमराहदेखील महागडा ठरला. बुमराहच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी सहज मोठे फटके खेळले. बुमराहच्या गोलंदाजीवरची फटकेबाजी पाहून तर रोहित शर्माने तोंड लपवलं, त्याची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सने रायन रिकल्टनच्या शतकी खेळीच्या बळावर २४३ धावांचा डोंगर उभारला. विल जॅक्स या सामन्यात सलामीला उतरला होता. जॅक्सने २२ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टनने ५५ चेंडूत १० चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२३ धावा केल्या आहेत. यासह मुंबई इंडियन्सने २० षटकांत २४३ धावा केल्या. पण प्रत्युत्तरात हैदराबादने १८.३ षटकांत २४९ धावा करत सहज सामना जिंकला.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी आणि कॅप्टन्सी यामुळे निराशा केली आहे. मुख्य म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेला शार्दुल ठाकूर सामन्यात एकदाही गोलंदाजीला आला नाही. त्याच्या व्यतिरिक्त मुंबईच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. ट्रेंट बोल्टने ४ षटकांत ४१ धावा दिल्या. बुमराहने ४ षटकांत ५४ धावा दिल्या. गझनफरने २ विकेट्स देऊनही ५१ धावा दिल्या. २ षटकांत अश्वनी कुमारने ४१ धावा दिल्या. तर हार्दिक पंड्याने ३.४ षटकांत ३९ धावा दिल्या.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. मुंबईकडून १८वं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करायला आला. १४ चेंडूत १८ धावांची गरज असताना सलील अरोरा स्ट्राईकवर होता. सलील अरोराने बुमराहच्या गोलंदाजीवर नो लुक षटकार खेचला. हा फटका पाहून सर्वच जण चकित झाले आणि रोहित शर्माने तर तोंड लपवलं. रोहित शर्माची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. रोहितची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आयपीएल २०२६ हंगामात बुमराह सध्या कठीण काळातून जात आहे. त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसल्यामुळे, हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मपैकी एक मानला जात आहे.
