Rohit Sharma Retirement Rumors: रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. रोहित शर्माचा भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानावर होणार वनडे सामना भारतासाठी अखेरचा सामना असणार अशी माहिती रिपोर्टमध्ये समोर आली होती. यामुळे २०२७ च्या वनडे विश्वचषकातून रोहित शर्मा बाहेर होणार हे निश्चित झालं होतं. ही माहिती समोर आल्यापासून सोशल मीडियावर रोहित शर्मा चर्चेचा विषय ठरला होता. रोहितच्या चाहत्या वर्गाने निवृत्ती घेऊ नकोस, असे जणू हजारो मेसेज पोस्ट शेअर केल्या आहेत. आता रोहित शर्माचा लॉर्ड्स वनडे सामना अखेरचा नसल्याचं बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. शुक्रवारी रात्री सैकिया यांनी पीटीआयला सांगितलं की, रोहितच्या भविष्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. रोहित लॉर्ड्सवर आपला शेवटचा सामना खेळणार असल्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांबाबत बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांचा मोठा खुलासा
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “प्रसारमाध्यमांमध्ये रोहित शर्माच्या भवितव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, त्याच्या लॉर्ड्सवरील रविवारी होणाऱ्या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. रोहित शर्मा हा भारतीय वनडे संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो संघाच्या भविष्यातील योजनांचा भाग आहे, तोपर्यंत तो देशाचं प्रतिनिधित्व करत राहील. त्यामुळे लॉर्ड्सवर होणारा वनडे सामना हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पीटीआयशी खास संवाद साधताना मांडली.
रोहित शर्माच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर २०२७ च्या आयसीसी पुरुष वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने युवा खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
३९ वर्षीय रोहित शर्माने सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. मात्र, सैकिया यांनी निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. तरीही, २०२७ च्या वनडे विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग असेल का, याबाबत त्यांनी कोणतीही ठोस हमी दिली नाही.
