Rohit Sharma speaks on viral T20 World Cup hug with Virat Kohli in Barbados: भारतीय संघाने १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील २०२४ मध्ये बार्बाडोसच्या मैदानावर टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. अगदी अटीतटीच्या सामन्यात भारताने अखेरच्या षटकात रोमांचक विजय मिळवला होता. भारताने जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला अश्रू अनावर झाले होते.
सर्वांच्या डोळ्यात मैदानावर आनंदाचे अश्रू होते. या जेतेपदानंतर मैदानावरील अनेक क्षण सर्वांच्या मनात घर करून बसले. पण रोहित शर्मा व विराट कोहलीचा ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवरील डोळ्यात अश्रू असताना एकमेकांना मिठी मारल्याचा व्हिडिओ मात्र सगळ्यांचा आवडता व्हिडिओ आहे. या व्हिडिओबाबत रोहित शर्माने त्याच्या फुल हाऊस विथ रोहित शर्मा या कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्माच्या फुल हाऊस विथ रोहित शर्मा या कार्यक्रमात अभिनेता अंगद बेदी पुढील भागात आपल्याला दिसणार आहे. यादरम्यान अंगद बेदीने रोहित शर्माला प्रश्न विचारला की, “तुझा आणि विराट कोहलीचा एक आयकॉनिक क्षण आहे. जेव्हा तो पायऱ्यांवर चढतोय आणि तू दोन पावलं मागे येतो… तेव्हा विराट त्याचे अश्रू सावरत असतो आणि तुम्ही दोघं एकमेकांना मिठी मारता… तो जो क्षण होता, त्यादरम्यान नेमक्या भावना काय होत्या… सांगशील का…”
यावर रोहित शर्मा म्हणाला, “२०१५ पासून २०२४ पर्यंत आम्ही त्या वर्ल्डकपच्या मागे धावत होतो. बरेचदा विश्वचषक जिंकण्याच्या जवळ आलो, पण जिंकण्यात अपयशी ठरलो. २०१५, २०१९ मध्ये विजयाच्या जवळ होतो, मग २०२३ ची तर मला आठवणच नकोय. १९ नोव्हेंबर दिवस मला विसरायचाय. पण त्यानंतर जे सहा महिने होते, मला कुठेतरी माहीत होतं की, २०२४ चा टी-२० विश्वचषक माझा अखेरचा वर्ल्डकप असणार आहे आणि माझं-विराट कोहलीचं यासंबंधित बोलणं झालं होतं, की यानंतर आम्ही दोघं टी-२० खेळणार नाही. त्यामुळे त्या वेळेला भावना इतक्या तीव्र होत्या की आम्ही त्या वर्ल्डकपसाठी एवढे झगडलो आहोत आणि जेव्हा फायनली विश्वचषक जिंकला, तेव्हा काही कळत नव्हतं काय करायचं. समोर बरंच काही घडत होतं आणि त्यावर प्रतिक्रिया देत होतो.”
भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचे दोन दिग्गज खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा व विराट कोहली यांनी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. विराट कोहलीने या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण अशा७६ धावा केल्या होत्या. यामुळेच भारतीय संघ १७६ धावसंख्या गाठू शकला. विराट कोहलीला अंतिम सामन्याचा सामनावीर खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं आणि त्याने तेव्हाच टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर भारताच्या विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं.
