Rohit Sharma Reveals Secret Behind On Field Abuses: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आपल्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, रोहितचा बिनधास्त अंदाज अनेकदा पाहायला मिळतो. मैदानावर खेळाडूंवर ओरडताना किंवा स्टम्प माइकवर त्याच्या तोंडून निघालेल्या शिव्या ऐकून चाहतेही अनेकदा हसतात. आता रोहितने या शिव्या नेमक्या कोणाकडून शिकल्या, याचा मजेशीर खुलासा केला आहे.
रोहित शर्मा सध्या ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात गायक मिका सिंगने रोहितच्या स्वभावावरून त्याची फिरकी घेतली. मिका म्हणाला, “माझा स्टाफ मला सांगतो की, मी घरी खूप शिव्या देतो. पण जेव्हा मी पाजींना (रोहित शर्माला) पाहिलं, तेव्हा मला वाटलं की यांनी तर माझा विक्रमच मोडला आहे.” मिकाचं हे बोलणं ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
यानंतर रोहितनेही या विषयावर दिलखुलास उत्तर दिलं. “मी खरं तर माझ्या पंजाबी सिनियर्सकडून शिव्या द्यायला शिकलो आहे. हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्याकडून मी हे शिकलो,” असं रोहितने सांगितलं.
रोहित पुढे म्हणाला की, जेव्हा तो भारतीय संघात नवीन होता, तेव्हा युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे त्याचे वरिष्ठ खेळाडू होते. मैदानावर खेळताना चुका झाल्या की त्यांच्याकडून ओरडा खावा लागायचा. मात्र, हे दोन्ही खेळाडू मनाने खूप चांगले होते. त्यामुळे ते रागावले किंवा शिव्या दिल्या, तरी रोहितला त्याचं वाईट वाटायचं नाही. तो त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचा.
रोहितच्या या मजेशीर वक्तव्यामुळे भारतीय संघातील जुन्या ड्रेसिंग रूममधील वातावरणाची एक मजेशीर झलक पाहायला मिळाली. मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारा रोहित मैदानाबाहेरही तितकाच बिनधास्त असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
