Rohit Sharma On How he bluffed DC to take review: आयपीएल २०२६ मध्ये आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी करताना टीदिल्ली कॅपिटल्स संघाला एक रिव्ह्यू वाया घालवण्यासाठी भाग पाडलं. रोहित शर्माने पहिल्या डावानंतर या घटनेचा पूर्ण खुलासा केला आहे. रोहित शर्मा आय़पीएलच्या सुरूवातीपासूनच चांगल्या फॉर्मात दिसत आहे. यासह दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळी करत हिटमॅनने ऑरेंज कॅप आपल्या नावे केली आहे. ऑरेंज कॅप घेतल्यानंतर रोहित नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.

कुलदीप यादवच्या नवव्या षटकात रोहित शर्माने स्वीप शॉट खेळला. यादरम्यान चेंडू टप्पा पडत केएल राहुलच्या हातात गेला. यावरून रोहित शर्मा झेलबाद झाल्याचं अपील कुलदीप व राहुलने घेतलं. रोहित शर्मानेही चेहऱ्यावर निराशा आणत तो काही पावलं क्रीज सोडून मागे चालत गेला. त्यामुळे कुलदीप यादवने सवयीप्रमाणे लगेचच रिव्ह्यूची मागणी केली. राहुलदेखील अक्षर पटेलला रिव्ह्यूसाठी तयार करताना दिसला.

दिल्ली कॅपिटल्सने रिव्ह्यू घेतल्यानंतर रोहित शर्मा सूर्याशी बोलत हसताना दिसला. रोहितच्या या डावपेचामुळे दिल्लीने एक रिव्ह्यू वाया घालवला. कुलदीप यादव आणि रिव्ह्यू हे समीकरण तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. रोहितने याचाच फायदा घेतला आणि दिल्लीला फसवलं.

रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सला रिव्ह्यू घेण्यासाठी आपल्या जाळ्यात कसं अडकवलं? म्हणाला…

रोहित शर्माला ऑरेंज कॅप मिळाल्यानंतर पहिल्या इनिंगविषयी बोलताना रवी शास्त्री यांनी या घटनेबद्दल विचारलं तेव्हा रोहित म्हणाला, “मी कुलदीपला खूप चांगला ओळखतो, तो पटकन DRS घेतो. त्यामुळे मी थोडा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तो निर्णय आमच्या बाजूने गेला, पण लगेचच पुढच्या षटकात मी बाद झालो. मला शक्य तितका वेळ खेळायचं होतं, पण तसं करता आलं नाही. पण त्यांच्याबरोबर मैदानावर थोडी मजा आली.”

रोहित यादरम्यान कुलदीपला काही म्हणाला का, यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, नाही, “तसं काही नव्हतं. मी फक्त चाललो होतो. मला माहित आहे की फिफ्टी फिफ्टी जर संधी असली तरी कुलदीप लगेच DRS घेतो, त्यामुळे मी थोडा प्रयत्न केला. तो आमच्या फायद्यात गेला, पण जसं की म्हणालो मी लगेचच बाद झालो. मला शेवटपर्यंत खेळायचं होतं, पण ते जमलं नाही.”