Rohit Sharma Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करताना दिसून आला. अखेर लागोपाठ पराभवानंतर मुंबईने विजयाची चव चाखली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २२८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून १०० हून अधिक धावा जोडल्या. यासह या जोडीने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यात २२९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. त्यामुळे मुंबईला चांगल्या सुरुवातीची गरज होती. ही सुरुवात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने करून दिली. रोहित गेले काही सामने दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. या सामन्यात पुनरागमन करताच त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली. रोहितने ८४ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टनने ८३ धावा केल्या.
या जोडीने मिळून पहिल्या विकेटसाठी १४३ धावा जोडल्या. यासह या जोडीने मुंबई इंडियन्स संघासाठी असं काही करून दाखवलं आहे, जे याआधी कोणालाच जमलं नव्हतं. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने मुंबई इंडियन्ससाठी तिसऱ्यांदा शतकी भागीदारी केली आहे. असा रेकॉर्ड करणारी ही पहिलीच जोडी ठरली. याआधी रोहित शर्मा – इशान किशन, सचिन तेंडुलकर – अंबाती रायडू, पार्थिव पटेल लेंडल सिमन्स या जोडीने प्रत्येकी २-२ वेळेस शतकी भागीदारी केली आहे. आता रोहित आणि रिकल्टनच्या जोडीने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यासह ३ वेळा शतकी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली आहे.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक वेळेस शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या
रोहित शर्मा / रायन रिकल्टन – ३ वेळा
रोहित शर्मा/ इशान किशन – २ वेळा
पार्थिव पटेल/ लेंडल सिमन्स – २ वेळा
सचिन तेंडुलकर/ अंबाती रायडू – २ वेळा
मुंबईचा दमदार विजय
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २२८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने ८४ तर रायन रिकल्टनने ८३ धावांची खेळी करून मुंबईला विजय मिळवून दिला.
