Rohit Sharma Shardul Thakur Video: आयपीएल २०२६ च्या हंगामाला २८ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेतही अनेक संघांमध्ये नवे चेहरे खेळताना दिसतील. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या संघात मुंबईचा राजा आणि संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा दाखल झाला आहे. संघात दाखल होताच रोहित शर्माने सरावाला देखील सुरूवात केली आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहित शर्माचा आणि शार्दुल ठाकूरचा व्हीडिओ शेअर केला आहे.

आयपीएल २०२६ करता खेळाडू आपआपल्या फ्रँचायझीमध्ये दाखल होत आहेत. संघातील या खेळाडूंसाठी फ्रँचायझीने खास व्हीडिओ तयार केले आहेत. मुंबई इंडियन्सने मुंबईचा राजा लिहिलेलं खास मुकूट तयार करतानाचा रोहित शर्माचा संंघात दाखल होतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्माला सुरूवातीला मुकूट घालताना दाखवलं आहे आणि यानंतर मुकूट कसं तयार होतो, म्हणजेच रोहितने कारकीर्द कशी घडवली हे सांगितलंय. अखेरीस रोहित सिंहासनावर बसून त्याच्यासमोर मुंबईचा राजा लिहिलेलं सोन्याचं मुकूट दाखवलं आहे.

रोहित शर्मा संघात दाखल झाल्यानंतरचा एक व्हीडिओ व्हायरल होत होता. रोहित शर्माच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहून चाहते उत्साहात आहेत. नेटमध्ये सामन्याच्या सरावादरम्यान भारताचा माजी कर्णधार आक्रमक फटकेबाजी करताना दिसला होता. यंदा रोहित शर्मा संपूर्ण सामना खेळणार असल्याचीदेखील चर्चा आहे. रोहित शर्मा गेल्या हंगामात फक्त फलंदाजीसाठी मैदानावर उतरत होता.

रोहित शर्मा-शार्दुल ठाकूरच्या सरावाचा व्हीडिओ

मुंबई इंडियन्सने आता रोहित शर्मा व शार्दुल ठाकूर यांचा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लॉर्ड ठाकूर व हिटमॅन यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. रोहित शर्माला शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत आहे. शार्दुलचा चेंडू येताच रोहित शर्माने बॅट फिरवत मोठा फटका खेळला. रोहित शर्माने चेंडू षटकारासाठी गेलेला पाहून कॅच पकडा, स्टँन्ड्समध्ये कॅच पकडा असं म्हणत त्याने अॅक्शन पण करून दाखवली. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, रोहितने एक जोरदार पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उंच गेला आणि एका क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला. त्यानंतर सरावादरम्यान त्याच्या सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या. मुंबई इंडियन्सने सोमवारी आयपीएल २०२६ साठी आपल्या हंगामपूर्व सरावाला अधिकृतपणे सुरुवात केली आहे.

आयपीएल २०२५ मध्ये कसं होती रोहित शर्माची कामगिरी?

२०२५ च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली, जिथे संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. हंगामाच्या सुरुवातीला कर्णधारपद सोडल्यानंतर, रोहित हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळला. या हंगामात रोहित अनेकदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरला. रोहित शर्मासाठी हंगामाची सुरुवात संथ झाली, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला लय साधण्यासाठी संघर्ष करावा लागला. हंगामाच्या उत्तरार्धात रोहितने अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळत शानदार पुनरागमन केलं. त्याने सलग दोन अर्धशतकं झळकावली आणि १५ सामन्यांमध्ये ४१८ धावा करून मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.