जागतिक क्रिकेटमध्ये सध्या टीम इंडियाचा एक यशस्वी संघ म्हणून नावलौकिक आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आजपर्यंत अनेक क्रिकेट सामने आणि मालिका जिंकल्या आहेत. भारताने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतदेखील धडाकेबाज कामगिरी केली होती. भारताच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय जितके विराटच्या नेतृत्वाशैलीला जाते, तितकेच रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या दमदार सलामीलादेखील जाते. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने हिटमॅन आणि गब्बर यांची सर्वोत्तम असल्याची पावती दिली आणि त्यामागचे कारणही सांगितले.

“शिखर धवन खूप मुक्तपणे खेळतो हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या खेळीमुळे रोहितला खेळपट्टीवर स्थिरावायला वेळ मिळतो. रोहित सुरुवातीला वेळ घेतो पण एकदा खेळपट्टी परिचयाची झाली की तो धडाकेबाज खेळी करतो. क्रिकेटमध्ये भागीदारी महत्वाची असते. तुमच्या भागीदाराने तुमची बलस्थानं आणि उणिवा समजून घेतल्या पाहिजेत. धवनला माहिती आहे की रोहितला सुरुवातीला थोडा वेळ हवा असतो, त्यानुसार तो मुक्तपणे खेळ करतो आणि जेव्हा फिरकीपटू येतात तेव्हा रोहित त्यांच्यावर हल्लाबोल करतो. म्हणूनच या दोघांची जोडी झकास आहे”, असे पठाण म्हणाला.

“मैदानात एखादा खेळाडू काहीसा शांत आणि आरामात दिसला, की लोक लगेच त्याला सुधारणा करण्याचा सल्ला द्यायला सुरूवात करतात. रोहितच्या बाबतीतदेखील हे अनेकदा घडलं आहे. असेच सल्ले क्रिकेट जाणकारांनी वसीम जाफरच्या काळात त्याला दिले होते. वसीम जाफरबाबत जे झालं, तेच रोहितबाबत होताना दिसत आहे. कदाचित रोहित स्वत: खूप परिश्रम घेत असेल, स्वत:ला अजून तंदुरूस्त करत असेल, पण तो तुम्हाला ते सारं सांगत नसेल. रोहित ज्यावेळी काहीही बोलतो, तेव्हा तो महत्त्वाच्या विषयांवर बोलतो. तो त्याच्या संघाबद्दल कायम बोलत असतो. म्हणूनच तो एक यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सला मिळालेली विजेतेपदं ही त्याच्या चांगल्या नेतृत्वशैलीची पावती आहे”, असे पठाणने सांगितले.