Rohit Sharma Slips Team Bus Viral Video IND vs WI ODI: भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाविरूद्ध ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विराट कोहली व रोहित शर्मा या सामन्यात मैदानात खेळताना पाहता येण्याचा आनंद चाहत्यांसाठी वेगळाच होता. रोहित शर्माने या सामन्यात चांगली सुरूवात केली आणि त्यानंतर विराट कोहलीने नाबाद १३५ धावांची शतकी खेळी केल्याने भारताने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयानंतर टीम हॉटेलमध्ये सेलिब्रेशन सुरू असताना रोहित शर्मा टीम बसमधून उतरताना पडल्याचं दिसलं, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने तिरूवनंतपुरममधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर संघ टीम बसमधून हॉटेलमध्ये पोहोचला. हॉटेलमध्ये संघाच्या विजयानंतर सर्वच जण संघाला शुभेच्छा देण्यासाठी सेलिब्रेशनसाठी थांबले होते. एकीकडे संघातील काही खेळाडू उतरून हॉटेलच्या दिशेने गेले होते. तर काही खेळाडू टीम बसमधून उतरत होते.

रोहित शर्मादेखील तितक्यात टीम बसमधून उतरण्यासाठी दरवाज्याजवळ येत होता. खालच्या पायरी पाय ठेवताच रोहित शर्माचा पाय घसरला आणि तो पडला. रोहितचा पाय घसरल्याचं पाहताच पोलिसांसह सर्वच जण त्याच्या दिशेने धावले आणि त्याला सावरत पुन्हा उभं राहण्यासाठी मदत केली. त्यानंतर रोहित हसऱ्या चेहऱ्यानेच उभा राहत पुढे गेला. दुसरीकडे हॉटेलबाहेर असलेला विराट कोहली टीम बसच्या दिशेने पाहत होता. रोहित शर्माचा पाय घसरल्यानंतर त्याच दिशेने विराट चिंतेने पाहत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रोहित शर्माचा हा व्हिडीओ भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यानंतरचा असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. रोहितचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रोहित पाय घसरून पडल्यानंतर इतरांच्या मदतीने उभा राहिला आणि चालू लागला, पण यामुळे त्याला काही दुखापतीचा फटका बसला नसावा. पण पाय घसरल्यानंतर रोहितचा पाय मुरगळला किंवा आपटला गेला असेल तर पुढच्या एकदिवसीय सामन्याला त्याला मुकावं लागेल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना बुधवार ३० सप्टेंबरला होणार आहे. हा सामना गुवाहाटीत होणार आहे. आता रोहित शर्मा या सामन्यात खेळणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.