Rohit Sharma uses Shardul Thakurs bat to smash historic century: लॉर्ड्सच्या मैदानावरील रोहित शर्माचा अखेरचा सामना अशा चर्चा सुरू असतानाच हिटमॅनने शतकी गर्जना केली. निवृत्तीची चर्चा होत असताना रोहितने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावलं. रोहित हा लॉर्ड्सच्या मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. पण रोहितने त्याच्या मित्राच्या बॅटने म्हणजेच लॉर्ड शार्दुल ठाकूरच्या बॅटने हे शतकं केलं. पण रोहितकडे शार्दुलची बॅट कशी आली, याचा किस्सा स्वत: शार्दुलने सांगितला.
लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात रोहित शर्माने ११० चेंडूंत १३८ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १७ चौकार आणि ५ षटकार लगावले. रोहित शर्मा या शतकी खेळीदरम्यान त्याची बॅट चेक असताना बॅटची खालची बाजू कॅमेऱ्यासमोर आली आणि त्यावर शार्दुल ठाकूर लिहिलं होतं. यादरम्यान स्वत: शार्दुल ठाकूर समालोचन करत होता आणि त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला की हो ही माझी बॅट आहे. टीव्ही समालोचनादरम्यान शार्दुल ठाकूर मजेत म्हणाला, “बघा, तुम्ही मला भारतीय संघाबाहेर ठेवू शकत नाही. स्वतःचीच स्तुती केल्याबद्दल मला माफ करा.”
आयपीएल कॅम्पमधील रोहितने लॉर्डकडून घेतलेल्या बॅटचा किस्सा
सामन्यानंतर शार्दुल ठाकूरला विचारण्यात आलं की तू तुझी बॅट रोहितला कधी दिलीस, यावर शार्दुल संपूर्ण किस्सा सांगताना म्हणाला, “आयपीएलदरम्यान कॅम्प सुरू होता, तेव्हा रोहित शर्मादेखील पहिल्या दिवसापासून तिथे पोहोचला होता. मी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होतो आणि मी दोन तीन सिक्स मारले. रोहित ते पाहत होता. त्यानंतर त्याने मला बोलावलं आणि म्हणाला तुझी बॅट बघू आणि विचारलं तुझ्याकडे अशा १-२ बॅट आहेत का… मी म्हटलं हो आणि त्याला मी बॅट दाखवल्या. त्याने ती बॅट घेतली आणि म्हटलं आता विसरून जा. मग आयपीएलदरम्यान अजून २-३ बॅट आल्या, तेव्हाही त्याने बघायला मागितली आणि मग म्हणाला, हा आता ही पण बॅट विसरून जा. तर असं सगळं घडलं. तो या खेळाचा लीजेंड आहे त्याला कोणी बॅटसाठी नाही म्हणेल का…”
लॉर्ड्सच्या मैदानावर रोहित शर्माने केवळ शतकच झळकावलं नाही, तर ‘हिटमॅन’ची कारकीर्द संपली आहे असं मानणाऱ्यांना चोख प्रत्युत्तरही दिलं. शिवाय, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तो टीम इंडियासाठी किती महत्त्वाचा आहे, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. उल्लेखनीय बाब म्हणजे, लॉर्ड्सवरील या शतकापूर्वी रोहितला संघर्षाचा सामना करावा लागत होता; त्याला मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रूपांतर करता येत नव्हतं, परंतु आता त्याने टीकाकार आणि निवड समिती अशा दोघांनाही आपल्या भूमिकेचा फेरविचार करण्यास भाग पाडलं आहे.
