Rohit Sharma Post For Team India: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर एकतर्फी विजयाची नोंद केली आणि सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. या विजयानंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने स्टोरी शेअर करून भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता. त्यावेळी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. ही स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे भारतीय टी-२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी सूर्यकुमार यादवने योग्यरित्या पार पाडली आणि भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप चॅम्पियन बनवलं.
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासाठी रोहित शर्माची खास पोस्ट
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरूवात होण्याआधी रोहित शर्माची टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे रोहितने प्रत्येक सामन्यात उपलब्ध राहून भारतीय संघाला समर्थन केलं. अंतिम सामन्यासाठीही रोहित शर्माने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली होती. यासह माजी कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोलो कॅप्शन देत त्याने, “संपूर्ण संघाने उत्तम कामगिरी केली. भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.” असं लिहिलं आहे.
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने २५५ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून पुन्हा एकदा संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली. संजूने या डावातही ८९ धावांची दमदार खेळी केली. तर अभिषेक शर्माने ५२ आणि इशान किशनने ५४ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ९६ धावांनी आपल्या नावावर केला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. याआधी कुठल्याही संघाला असा कारनामा करता आलेला नाही. यासह मायदेशात टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे.
