Rohit Sharma 35th ODI Century Celebration Reason Match Analysis: भारतीय संघाने रोहित शर्माचं शतक व शुबमन गिलच्या द्विशतकी खेळीच्या बळावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताने वेस्ट इंडिजचा ४३.३ षटकांत ८ विकेट्सने पराभव केला. २००६ नंतर पहिल्यांदाच एकदिवसीय इतिहासात ४०० अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे भारतीय संघाचा हा विजय अधिक खास व ऐतिहासिकरित्या ठरला. रोहितने सामन्यानंतर त्याच्या शतकानंतर सेलिब्रेशनबाबत मोठा खुलासा केला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयामध्ये हिटमॅन रोहितच्या शतकाचा आणि चांगल्या सुरूवातीचा मोठा वाटा आहे. शुबमन गिलने द्विशतक केलं खरं पण त्याने सुरूवात मात्र संथ केली आणि त्यादरम्यान रोहित शर्माने भारतीय संघाचा धावफलक आपल्या अनुभवी खेळीच्या बळावर चालता ठेवला. रोहित शर्माने या सामन्यात १०१ धावांची खेळी केली आणि बाद झाला. रोहितने ७५ चेंडूत १० चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. रोहितने हे शतक झाल्यानंतर मैदानावर जणू उड्या मारून डान्स करत आपल्या शतकाचं सेलिब्रेशन केलं.
रोहित शर्मा भारताच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाला?
रोहितला सामन्यानंतर सर्वात आधी त्याच्या या शतकानंतरच्या सेलिब्रेशनबाबत विचारण्यात आलं. यावर रोहित शर्माने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेणार ठरलं. आपल्या ३५व्या वनडे शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशनबद्दल रोहित शर्माने सांगितलं की, ते सेलिब्रेशन खास स्वतःसाठी होतं. रोहित म्हणाला, “मी हे सेलिब्रेशन स्वतःपुरतं ठेवतो. ते माझ्यासाठी आहे. काही गोष्टी फक्त तुमच्यासाठी असतात, त्या इतरांबरोबर शेअर करण्यासाठी नसतात. त्यामुळे ते सेलिब्रेशन माझ्यासाठीच होतं.”
शुभमन गिलबरोबरच्या २००हून अधिक धावांच्या भागीदारीबद्दल रोहित म्हणाला, “खेळपट्टी चांगली होती आणि आम्हाला फक्त फलंदाजी करत राहायचं होतं. खरं सांगायचं तर आम्ही स्कोअरबोर्डचा फार विचार करत नव्हतो. प्रत्येक चेंडू त्याच्या गुणवत्तेनुसार खेळण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यातून मोठी भागीदारी होत गेली. अशा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोठ्या भागीदारी रचत राहणं गरजेचं असतं आणि आम्ही तेच केलं. दुसऱ्या बाजूला गिल अप्रतिम फलंदाजी करत होता. संपूर्ण डावात त्याच्या फलंदाजीवर त्याचं खूप नियंत्रण होतं. शेवटपर्यंत नाबाद राहणंही पाहायला छान होतं.”
जडेजाने रोहितला सेलिब्रेशनबद्दल विचारलं, तेव्हा…
रोहितने आपल्या शतकानंतरच्या सेलिब्रेशनबद्दलही मजेशीर किस्सा सांगितला. “जडेजाने मला विचारलं की ते सेलिब्रेशन कशासाठी होतं? मी त्याला सांगितलं की ड्रेसिंग रूममध्ये सांगतो. ते माझ्यासाठी होतं,” असं रोहित म्हणाला.
यानंतर जडेजाने रोहितसाठी वेगळ्या सेलिब्रेशनची योजना आखली होती. याबद्दल रोहित म्हणाला, “तो खूप कल्पक होता. त्याला मी शतकानंतर स्लाइड करावी आणि उडी मारावी, असं वाटत होतं. पण मी त्याला सांगितलं की, मित्रा, ५० षटकं क्षेत्ररक्षण केल्यानंतर आणि जवळपास २५-३० षटकं फलंदाजी केल्यानंतर मी असं काही करणार नव्हतो.”
पहिल्या डावात कडक उन्हात तब्बल ५० षटकं क्षेत्ररक्षण केल्यानंतर फलंदाजी करणं आव्हानात्मक होतं. याबद्दल रोहित म्हणाला, “हे पुन्हा एकदा एकाग्रतेशी संबंधित आहे. स्वतःला सतत सांगावं लागतं की विकेट टाकायची नाही. परिस्थिती आव्हानात्मक होती, पण अशा वेळी इतकी वर्षे क्रिकेट खेळल्याचा अनुभव कामी आणायचा होता. तुम्हाला इतक्या सहज विकेट गमवायची नसते आणि शक्य तितका वेळ सामन्यात टिकून राहायचं असतं.”
रोहित पुढे म्हणाला, “आम्हाला माहिती होतं की खेळपट्टी चांगली आहे आणि टॉप ऑर्डरकडून मोठ्या धावांची गरज आहे. नेमकं तेच घडलं. सुरुवातीला आमची खूप चांगली भागीदारी झाली आणि त्यातूनच सामना आमच्या बाजूने जवळपास निश्चित झाला. आमच्यात २५०हून अधिक धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या बाजूला गिलला अशाप्रकारे फलंदाजी करताना पाहणं अप्रतिम होतं. सामना अशा सकारात्मक पद्धतीने संपवता आला, याचा आनंद आहे.”
