Rohit Sharma retirement rumors response: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात हिटमॅन रोहित शर्माची झलक पाहायला मिळाली. इंग्लंडने दिलेल्या डोंगराएवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने लॉर्ड्सच्या मैदानावर शतकी खेळी साकारली. इंग्लंडविरूद्ध मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये धावांसाठी झगडणाऱ्या रोहितच्या भविष्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या, यादरम्यान त्याने शतक झळकावत सर्वांनाच चांगलं उत्तर दिलं. या शतकी खेळीनंतर बीसीसीआयने रोहित शर्माच्या मुलाखतीचा व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने बाहेरील चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडने दिलेल्या ३८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिल व रोहित शर्माने १४६ धावांची भागीदारी रचत चांगली सुरूवात केली. यानंतर रोहितने ८४ चेंडूत आपलं शतक झळकावलं व रोहित १७ चौकार व ५ षटकारांसह १३८ धावांची खेळी करत बाद झाला. तिसऱ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा लॉर्ड्सवरील सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो अशा बातम्या समोर आल्या होत्या.

भारताच्या निवड समितीने रोहित शर्माला तो वनडे वर्ल्डकप २०२७ साठी संघरचनेचा भाग नसल्याचं त्याला सांगितलं, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे लॉर्ड्सवरील वनडे सामना रोहितचा अखेरचा सामना असू शकतो, अशीही माहिती समोर आली. पण सामन्यापूर्वी बीसीसीआयने रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा खोदून काढत अशी कोणतील चर्चा न झाल्याचं सांगितलं. यावर आता रोहित शर्मा मुलाखतीत काय म्हणाला, पाहूया.

रोहित शर्माचं निवृत्तीच्या चर्चांवर मोठं वक्तव्य

रोहित शर्मा निवृत्तीच्या चर्चांबाबत म्हणाला, “माझी भूमिका म्हणजे फलंदाजी करणं आणि भारताचं प्रतिनिधित्व करत देशासाठी सर्वोत्तम खेळ करणं. क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून मला हेच शिकवलं गेलं आहे आणि मी पुढेही तेच करत राहणार आहे. माझ्या पदार्पणापासून माझ्याबद्दल अशा चर्चा होत आल्या आहेत आणि मी क्रिकेट खेळत असेपर्यंत त्या सुरूच राहतील. त्यामुळे अशा चर्चांना मी फारसं महत्त्व देत नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मैदानावरची कामगिरी आणि संघाच्या यशात मी किती योगदान देऊ शकतो, यावरच माझा पूर्ण भर असतो.”

रोहित पुढे म्हणाला “लोकांना चर्चा करू द्या. बोलणारे बोलत राहतात. माझं काम मैदानावर खेळणं आणि संघासाठी योगदान देणं आहे. मैदानाबाहेर काय बोललं जातं, ते त्यांचं काम आहे. मी त्याकडे अशाच पद्धतीने पाहतो.”

रोहित शर्मा या मुलाखतीत बोलताना पराभवामुळे निराश झाल्याचं देखील म्हणाला, याशिवाय भारताच्या सांघिक कामगिरीबाबत देखील त्याने वक्तव्य केलं. तर शतकाच्या वेळी विराट कोहली मैदानावर असल्यामुळे अधिक चांगलं वाटलं, असंही रोहित मुलाखतीत म्हणाला.