Rohit Sharma T20 WC 2026 Brand Ambassador: भारताचा टी-२० विश्वचषक २०२६ मधील सलामीचा सामना अमेरिका संघाबरोबर खेळवला जात आहे. हा सामना मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर होत आहे. टीम इंडियाची वर्ल्डकप सामन्याला सुरूवात फारशी चांगली झालेली नाही. टीम इंडियाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला. पण ५० धावांच्या आतच भारतीय संघाने ३ विकेट्स गमावल्या. पण भारताचा हा सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला, जाणून घेऊया.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने बार्बाडोसमध्ये टी-२० विश्वचषक २०२४ चं जेतेपद पटकावलं होतं. या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडत संघाचं पुढे येऊन नेतृत्त्व केलं होतं. याशिवाय रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्त्वाची झलकदेखील पाहायला मिळाली होती. रोहितने हा विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.
टी-२० फॉरमॅटमधून निवृत्तीनंतर रोहित शर्माला भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६चा ब्रँड अम्बेसेडर करण्यात आलं. यामुळे रोहित शर्मा भारत आणि अमेरिका यांच्यातील होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी वानखेडे मैदानावर हजर होता. रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी मैदानावर घेऊन येताना दिसला. हिटमॅन दिसताच वानखेडेमध्ये ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’चे नारे ऐकू येत होते.
रोहित शर्माचं भारताच्या सामन्यापूर्वी मोठं वक्तव्य
रोहित शर्मा भारताचा सामना सुरू होण्यापूर्वी म्हणाला, “आमच्यासाठी (टी-२० वर्ल्डकप विजयाचा) हा संपूर्ण प्रवासच आठवणींनी भरलेला होता. अर्थात, जेव्हा आम्ही ट्रॉफी उंचावली, ती क्षणिक आठवण सगळ्यात खास होती. पण स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतचा प्रत्येक टप्पा आमच्यासाठी एक सुंदर आठवण ठरला, जी आम्ही कायम जपून ठेवू. त्या ट्रॉफीसाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. अमेरिका गाठलेल्या पहिल्या दिवसापासून ते बार्बाडोसहून परत येईपर्यंतचा प्रत्येक क्षण संस्मरणीय होता. तो अनुभव खरंच अप्रतिम होता.”
“माझ्या कारकिर्दीच्या इतक्या सुरुवातीच्या टप्प्यात ICCचा अॅम्बेसेडर होईन, अशी अपेक्षाच नव्हती. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ट्रॉफी पुन्हा हातात घेऊन तिला पुन्हा खेळात परत आणणं खूप छान वाटतं. ट्रॉफी जिंकण्याचा आनंद वेगळाच होता, पण ती पुन्हा मैदानात आणून हे तरुण खेळाडू त्या ट्रॉफीसाठी पुन्हा एकदा झटताना पाहणं खूप रंजक ठरेल. याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे,” असं रोहितने ब्रँड अम्बेसेडर होण्याबद्दल सांगताना म्हणाला.
“या स्पर्धेत उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळावं, हीच आमची इच्छा आहे आणि ICC नेहमीच तेच घडवून आणतं. ICC म्हणजे सर्वोत्तम क्रिकेटचं व्यासपीठ. मैदानात उतरणारा प्रत्येक संघ आपलं सर्वोत्तम देतो आणि त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा नक्कीच मनोरंजक ठरणार आहे,” असं रोहित म्हणाला.

