पीटीआय, ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल आठ’ फेरीचे वेळापत्रक जरा धकाधकीचेे असले, तरी आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. आता कोणतेही कारण देणे योग्य ठरणार नाही. आमचे खेळाडू या स्पर्धेत काहीतरी खास करण्यासाठी उत्सुक आहेत, असे वक्तव्य भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले.
‘अव्वल आठ’ फेरीत भारतीय संघ प्रथम अफगाणिस्तानविरुद्ध २० जूनला (गुरुवार) सामना खेळेल. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भारताला बांगलादेश (२२ जून, शनिवार) आणि त्यानंतर पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीने तुल्यबळ ऑस्ट्रेलिया (२४ जून, सोमवार) या संघांविरुद्ध खेळावे लागणार आहे. त्यातच भारताचे हे तीनही सामने वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित मात्र असे कोणतेही कारण देण्यासाठी तयार नाही.
‘‘अव्वल आठ फेरीत पहिला सामना खेळल्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत आम्हाला दोन सामने खेळावे लागणार आहेत. हे वेळापत्रक आमच्यासाठी जरा धकाधकीचेे असले, तरी आम्हाला याची सवय आहे. आम्हाला कायमच खूप प्रवास करावा लागतो आणि विविध ठिकाणी सामने खेळावे लागतात. त्यामुळे या गोष्टींचा कामगिरीवर परिणाम झाला, असे कारण कधीही देणार नाही,’’ असे रोहित ‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीमध्ये म्हणाला.
‘‘आमचे खेळाडू काहीतरी खास कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (बाद फेरी) पूर्णपणे सज्ज आहोत. आम्ही सर्व सराव सत्रांकडे गांर्भीयाने पाहतो. प्रत्येकच सराव सत्रात तुम्हाला एखाद्या त्रुटीवर काम करण्याची किंवा नवे काही शिकण्याची संधी असते. त्यामुळे या सत्रांचा पुरेपूर वापर करण्याचा आमचा प्रयत्न असतो,’’ असे रोहितने नमूद केले.
वेस्ट इंडिजमध्ये खेळण्याचा अनुभव फायदेशीर
ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने आपले सर्व साखळी सामने अमेरिकेत खेळले. अमेरिकेतील ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांना धावा करण्यासाठी बरेच झगडावे लागले. मात्र, आता बाद फेरीचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार असल्याने येथे भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत मोठी सुधारणा अपेक्षित आहे. ‘‘आम्ही वेस्ट इंडिजमध्ये बरेच सामने खेळलेले आहेत, तसेच येथे झालेले बरेच सामने आम्ही पाहिलेही आहेत. हा अनुभव नक्कीच आमच्या कामी येईल. विंडीजमध्ये खेळताना सकारात्मक निकाल मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, हे आम्हाला ठाऊक आहे. इथे सामने खेळण्यासाठी आणि त्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत,’’ असे रोहित म्हणाला.
