Rohit Sharma Team Hotel Viral Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका संपली असून टी-२० संघाचा भाग नसलेले खेळाडू माघारी परतले आहेत. या मालिकेत विराट कोहलीने आपला फॉर्म दाखवला, पण रोहित शर्मा मात्र तिन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इंदूर वनडे सामन्यानंतरचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला अचानक ओरडत रोहित शर्माजवळ धावत पोहोचली. टीम हॉटेलमधील हा संपूर्ण प्रसंग आहे.

रोहित शर्मा सामन्यानंतर टीम हॉटेलमध्ये पोहोचला होता. त्याच्याबरोबर संपूर्ण सिक्युरिटी होती. यादरम्यान अचानक, एक महिला आली, सुरक्षारक्षकांच्या मधूनच ती रोहित शर्माजवळ पोहोचली आणि तिने त्याचा हातही धरला. अचानक त्या महिलेला पाहून हिटमॅनलाही धक्का बसला, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला रोहितपासून दूर नेलं.

रोहित शर्माचा हात धरताना, ती महिला “मदत करा, मदत करा!” असं ओरडत होती. रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार त्या महिलेची मुलगी गंभीर आजाराने त्रस्त आहे. तिच्या मुलीला वाचवण्यासाठी तिला ९ कोटी रुपयांचं इंजेक्शन हवं आहे, असं तिचं म्हणणं आहे आणि म्हणूनच तिने रोहित शर्माकडे मदतीसाठी पोहोचली होती.

त्या महिलेचं नाव सरिता शर्मा असल्याचं नंतर समोर आलं आहे. ही महिला रोहित शर्मासह सेल्फी घेण्यासाठी वा त्याला कोणताही त्रास देण्यासाठी पोहोचली नसल्याचं देखील तिने सांगितलं. गरजू मुलांना मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित आणि विराट कोहली यांना वैयक्तिकरित्या तिच्या मुलीच्या आजारपणासाठी मदतीचा हात मागण्यासाठी ती महिला पोहोचल्याचे तिने सांगितले.

रोहित शर्माची बॅट ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या मालिकांमध्ये चांगलीच तळपली होती. पण न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिकेत मात्र रोहित शर्मा खास कामगिरी करू शकला नाही. यामुळे त्याचा फॉर्म सध्या चर्चेचा विषय आहे. रोहितने इंदूरमधील तिसऱ्या वनडे सामन्यात फक्त ११ धावा केल्या आणि बाद झाला. तर पहिल्या व दुसऱ्या वनडे सामन्यातही तो फेल ठरला. यासह त्याने न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिकेत फक्त ६१ धावा केल्या. वनडे मालिकेत फेल ठरल्याचा आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्येही त्याला फटका बसला आहे. नव्या वर्षात वर्ल्ड नंबर वन खेळाडू असलेला रोहित आता थेट चौथ्या स्थानी घसरला आहे.

रोहित शर्मा पाच महिन्यानंतर आता थेट टीम इंडियासाठी खेळताना दिसेल. यादरम्यान तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. टीम इंडिया जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. रोहितने आधीच कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.