Rohit Sharma Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पंजाब किंग्सने २०० धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्ट यांनी दमदार सुरुवात करुन दिली. यादरम्यान २ षटकार खेचताच रोहित शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यात २०१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला चांगल्या सुरुवातीची गरज होती. ही सुरुवात सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या जोडीने करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. यादरम्यान रोहितने २६ चेंडूत २५ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ षटकार खेचले. यासह रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने आंद्रे रसेलला मागे टाकलं आहे.
आयपीएलमध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला चौथा फलंदाज
आयपीएल स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने आतापर्यंत ३८ षटकार खेचले आहेत. या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर ४६ षटकारांसह निकोलस पूरन अव्वल स्थानी आहे. अभिषेक शर्माने ४१ षटकार खेचले आहेत.तर संजू सॅमसनने ४० षटकार खेचले आहेत. आंद्रे रसेलच्या नावे आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना ३६ षटकार खेचण्याची नोंद आहे.
आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज
निकोलस पूरन- ४६ षटकार
अभिषेक शर्मा- ४१ षटकार
संजू सॅमसन- ४० षटकार
रोहित शर्मा- ३८ षटकार*
आंद्रे रसेल- ३६ षटकार
केएल राहुल- ३६ षटकार
मुंबईचा दमदार विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयासाठी २०१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टने ४८ धावा केल्या. मुंबईने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
