Rohit Sharma Teasing Ajinkya Rahane: मुंबई इंडियन्सनने केकेआरचा ६ विकेट्सने पराभव करत स्पर्धेला विजयाने सुरूवात केली आहे. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला सामना जिंकत १४ वर्षांचा बट्टा मोडून काढला. यादरम्यान केकेआरचा कर्णधार दुखापतीमुळे मैदानाबाहेर झाला. अजिंक्यला खूप त्रास होत असल्याने तो मैदानावर झोपला आणि त्याला चालायला त्रास होत असताना रोहित शर्मा भर मैदानात रहाणेची थट्टा करताना दिसला.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला क्रॅम्प्स आले. मुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकानंतर, रहाणे वेदनेने विव्हळत मैदानावर झोपला. त्याला तपासण्यासाठी केकेआरच्या फिजिओला मैदानावर यावं लागलं. रहाणेला खूप वेदना होत असल्याचं दिसत होतं आणि त्यामुळे त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्माचा अजिंक्य रहाणेला चिडवतानाचा फोटो व्हायरल

त्यावेळी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी करत मैदानावर होता. अजिंक्य रहाणे त्याच्या जवळून मैदानाबाहेर जात होता. अजिंक्यला चालायला त्रास होत असताना पाहून रोहित त्याला चिडवू लागला. हे पाहून वेदना होत असूनही अजिंक्य रहाणेला हसू आवरलं नागी. केकेआरचा फिजिओसुद्धा हसू लागला. तितक्यात रोहितने अजिंक्यला मिठी मारली आणि रहाणे मैदानाबाहेर गेला.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे हे जुने मित्र आहेत. दोघेही मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतात. रोहितने २००६ मध्ये, तर रहाणेने २००७ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ते भारतीय संघातही बऱ्याच काळापासून एकत्र खेळले आहेत. गाबामधील भारताच्या ऐतिहासिक कसोटी विजयादरम्यान दोन्ही खेळाडू संघाचा एकत्र भाग होते.

अजिंक्य रहाणे संघातून बाहेर पडल्यानंतर उपकर्णधार रिंकू सिंहने संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी घेतली. या हंगामाच्या सुरुवातीला केकेआरने रिंकूला उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं होतं. क्षेत्ररक्षणात रहाणेच्या जागी मनीष पांडेला संधी मिळाली. या सामन्यात रहाणेने ४० चेंडूंमध्ये ६७ धावा करत एक स्फोटक खेळी केली, जी त्याच्या संघासाठी त्याची सर्वोच्च खेळी ठरली. रहाणेने ३ चौकार व ५ षटकारांसह केलेल्या स्फोटक खेळीच्या बळावर त्याने संघाला २२० धावांचा पल्ला गाठण्यात मदत केली.

अजिंक्य रहाणेशिवाय या सामन्यात अंगक्रिश रघुवंशीने उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. तर रिंकू सिंहने महत्त्वाचं योगदान दिलं. पण दुखापतींचा फटका बसलेल्या केकेआरला अनुभवहीन गोलंदाजी आक्रमणामुळे धावांचा बचाव करता आला नाही आणि मुंबईने सहज विजय मिळवला.