Rohit Sharma On Test Cricket: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाची ट्रॉफी जिंकून दिली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने विराट कोहलीसह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम केलं. सध्या तो वनडे संघाचा भाग आहे. नुकताच त्याने आपल्या नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. सोनी टीव्हीवर त्याचा नवीन शो ‘फॅमिली फुल हाऊस विद रोहित शर्मा’, रिलीज झाला आहे. या शो दरम्यान त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक मजेशीर किस्से सांगितले आहेत. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील एक खास किस्सा देखील सांगितला आहे.
या शोमध्ये रोहित म्हणाला की, “कसोटी क्रिकेट हा खूप कठीण फॉरमॅट आहे. कारण प्रत्येक दिवशी एक नवं आव्हान असतं. त्यामुळेच मी खूप तणावात असायचो. त्यामुळेच मला रात्रीची झोप यायची नाही. कधी कधी तर मी पूर्ण रात्र जागायचो. त्यावेळी माझ्याकडे एक खास नाश्ता असायचा, तो म्हणजे माझ्या आईने दिलेले केळ्याचे वेफर्स. कसोटी सामन्यादरम्यान मी हे वेफर्स माझ्यासोबतच ठेवायचो. रात्री जेव्हाही काही खायची इच्छा व्हायची, मी केळ्याचे वेफर्स खायचो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “माझी आई केळ्याचे वेफर्स नेहमीच्या पद्धतीने फ्राय करत नव्हती, तर वेफर्स बेक करून तयार करायची. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील तणावपूर्ण दिवसांमध्ये घरच्या जेवणाचा एक छोटासा आधार मिळायचा.” आईच्या हातचे हे वेफर्स रोहितसाठी केवळ एक स्नॅक्स नव्हते, तर त्यात घरची आठवण आणि आरामदायी घरगुती चवीची भावनाही जोडलेली होती.
रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यादरम्यान त्याला ६७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये १२ शतकं आणि १८ अर्धशतकं झळकावली. तर २१२ धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. २०२४ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
