Virat Kohli Rohit Sharma Run Out Banter Video: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना म्हणजे रोहित शर्मा व विराट कोहली या दिग्गजांना एकाच सामन्यात खेळताना पाहण्याची संधी मिळते. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही दुसऱ्या डावात मात्र फार वेळ मैदानात दिसले नाहीत. विराट कोहली व रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर होण्यापूर्वी पहिल्या डावामधील दोघांचा एक कमाल व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने पहिल्या डावात आपल्या कमालीच्या फटकेबाजीने वानखेडेच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी मनं जिंकली. आरसीबीचे सलामी फलंदाज विराट कोहली व फिल सॉल्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १२० धावांची भागीदारी रचली. फिल सॉल्टने २५ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं. तर विराट कोहली दुसऱ्या टोकाला उभा राहून त्याला चांगली साथ देत होता. सॉल्टच्या फटकेबाजीदरम्यान विराटने शांत खेळ केला, दरम्यान काही चांगले फटकेदेखील खेळले.
रोहित शर्माच्या रनआऊट धमकीवर विराट कोहलीची प्रतिक्रिया
१०व्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत असताना मैदानावर रो-कोमधील एक खास क्षण पाहायला मिळाला. १०व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सॉल्टने फटका खेळला आणि चेंडू रोहित शर्माच्या दिशेने गेला. यादरम्यान विराट व सॉल्ट एक धाव चोरायला पाहत होते. तितक्यात रोहितने चेंडू उचलला आणि नॉनस्ट्राईकरच्या दिशेने त्याचा रोख केला. रोहित चेंडू फेकण्याच्या तयारीत उभा होता आणि जणू काही रनआऊट करेन हा अशी धमकी विराट कोहलीला देत होता.
विराट कोहलीने हे चित्र पाहताच विराटही धावत यायचं सोडून तिथेच थांबला आणि रोहितला आऊट कर असं आपल्या अॅक्शनमधून दाखवून देत होता. रोहित शर्मा व विराट कोहली यांचा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून चाहत्यांना हा व्हीडिओ प्रचंड भावला आहे. रोहित-विराटच्या या व्हीडिओदरम्यान मात्र हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया मात्र ‘यांचं काय चाललंय’ अशी होती.
विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. कोहली ३८ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ५० धावा करत बाद झाला. विराट कोहली १५व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या विकेटनंतरही आरसीबीने मोठी धावसंख्या उभारली. तर प्रत्युत्तरात २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर परतला. रोहित शर्मा १९ धावा करत मैदानाबाहेर गेला.
