scorecardresearch

“यावर चर्चेचा प्रश्नच नाही, विराट कोहलीनंतर…”, पुढच्या टी-२० कर्णधाराविषयी माजी क्रिकेटपटूची भूमिका!

विराट कोहलीनं टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आजी-माजी खेळाडूंकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

“यावर चर्चेचा प्रश्नच नाही, विराट कोहलीनंतर…”, पुढच्या टी-२० कर्णधाराविषयी माजी क्रिकेटपटूची भूमिका!
विराट कोहलीनंतर टी-२० संघाचा कर्णधार कोण होणार? (फोटो-पीटीआय)

भारतीय टी-२० क्रिकेट संघामध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय आज कर्णधार विराट कोहलीनं जाहीर केला आहे. भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराटनं म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं विराटनं जाहीर केलं आहे. यानंतर साहजिकच विराटनंतर कुणाकडे टी-२० संघाचं कर्णधारपद जाणार? याविषयी मोठी चर्चा सुरू होती. या चर्चेवर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूने स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच खेळाडूचं नाव निश्चित असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

१९८३ मध्ये भारतानं पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्या संघात दिग्गज जलदगती गोलंदाज मदन लाल यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. मदन लाल हे सध्या क्रिकेट सल्लागार मंडळाचे प्रमुख आहेत. त्यांनी विराटच्या निर्णयानंतर कर्णधारपद कुणाकडे जाणार? याविषयी ठाम भूमिका मांडली आहे.

टी-२० कर्णधारपद सोडण्याच्या विराटच्या निर्णयावर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…!

“यावर चर्चेचा प्रश्नच येत नाही”

विराट कोहलीनंतर टी-२० संघाचा कर्णधार कोण होणार? याविषयी मदन लाल म्हणतात, “या मुद्द्यावर चर्चा करण्यात मला काहीही अर्थ वाटत नाही. या जबाबदारीसाठी रोहीत शर्मा हाच एक पर्याय आहे. रोहित शर्मानं तब्बल पाच वेळा मुंबई इंडियन्स संघाला आपल्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून दिलं आहे. जर तो भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार झाला, तर त्याच्या या अनुभवाचा संघाला फायदाच होईल”. दरम्यान, “रोहित शर्माला टी-२० संघाचा कर्णधार केलं आणि त्यानं चांगली कामगिरी केली, तर निवडकर्ते त्याचा एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून देखील विचार करतील”, असं देखील मदन लाल म्हणाले.

 

विराट कोहलीनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून टी-२० कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं जाहीर केलं आहे. “आपल्यावर असणारा ताण समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि गेल्या ८ ते ९ वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमसाठी तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागलं आहे की मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळं काही संघाला दिलं आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे”, असं विराटनं ट्वीट केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या