भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कर्णधार रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने गेल्या १० महिन्यांत दोन आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केल्या. रोहितच्या क्रिकेटमधील अद्वितीय कामगिरी पाहता वानखेडे स्टेडियममधील एका स्टँन्डला रोहितचं नाव देणार रोहित शर्मा देखील मुंबईचा खेळाडू आहे. याशिवाय त्याने मुंबई संघाकडूनच देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन वानखेडे स्टेडियममधील एका स्टँन्डला रोहित शर्माचं नाव देण्याचा निर्णय घेणार आहे. २०१९ मध्ये, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने अरुण जेटली स्टेडियममधील एका स्टँडला विराट कोहलीच्या सन्मानार्थ नाव दिले. आता मुंबई क्रिकेट असोसिएशन रोहित शर्माचे नाव स्टँन्डला देणार असल्याचे समोर येत आहे.

वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला नाव देण्याच्या बाबतीत मुंबईच्या इतर दिग्गजांसह भारतीय कर्णधाराचे नाव यादीत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एमसीएला त्यांच्या क्लब सदस्यांकडून आठ विनंत्या आणि प्रस्ताव मिळाले आहेत. यामध्ये माजी अध्यक्ष शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्याशिवाय माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई, पद्माकर शिवलकर, माजी भारतीय महिला कर्णधार डायना एडुलजी आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.

एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “सदस्यांकडून नाव सुचवण्यात आली आहेत आणि अंतिम निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य घेतील.”

समोर आलेल्या अहवालानुसार, हा निर्णय १५ एप्रिल रोजी होणाऱ्या एमसीएच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत घेतला जाईल, ज्यामध्ये रोहितच्या नावावर चर्चा केली जाईल. ३७ वर्षीय रोहितने गेल्या १० महिन्यांत भारतासाठी सलग दोन आयसीसी जेतेपदं जिंकली आहेत. तर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा संघाचे जेतेपद पटकावले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्सचं होमग्राऊंड आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर गेल्या महिन्यात दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मुंबईच्या इतर कोणत्याही खेळाडूला या कामगिरीची बरोबरी करता आलेली नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला.

अहवालात पुढे म्हटले आहे की, एमसीएकडे वानखेडे स्टेडियममध्ये नाव देण्यासाठी फक्त एकच ग्रँडस्टँड आहे, जे प्रेसिडेंट्स बॉक्सच्या वर आहे. नॉर्थ स्टँडचं नाव दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर ठेवलं आहे, वेस्ट स्टँडचं नाव विजय मर्चंट आणि ईस्ट स्टँडचे नाव दिग्गज सुनील गावस्कर असं आहे.