Rohit Sharma Tricks Kuldeep Yadav KL Rahul Video: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने केएल राहुल व कुलदीप यादवला असं काही चकवलं की त्यांनी एक रिव्ह्यू वाया घालवला. मुंबई आणि दिल्ली यांच्यात आयपीएलमधील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम गोलंदाजीसाठी पाचरण केलं आणि खूप स्लो असलेल्या या खेळपट्टीवर मुंबईचा संघ १६२ धावा करण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान रोहित शर्माच्या या घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या आजारी असल्यामुळे खेळू शकला नाही, त्यामुळे मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व आज सूर्यकुमार यादव करणार आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या ३५ धावांनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढे येत अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तर सूर्या व रोहितने अर्धशतकी भागीदारी साकारत मुंबईला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली.
मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. रायन रिकेल्टन ९ धावांवर आणि तिलक वर्मा शून्यावर एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याने अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि केएल राहुल यांना रिव्ह्यू घ्यायला भाग पाडलं.
रोहित शर्माच्या जाळ्यात अडकत राहुल-कुलदीपने रिव्ह्यू घेतला
ही घटना कुलदीप यादवच्या नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर घडली. रोहितने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला न लागता विकेटकीपरकडे गेला. त्यानंतर झेलबाद झाल्याचं जोरदार अपील करण्यात आलं. अपीलनंतर रोहित स्केवर लेगच्या दिशेने मागे चालत जाऊ लागला, जणू काही तो बाद झाल्याचं त्याने नाटक केलं. रिव्ह्यू घेतल्यानंतर रोहित पुन्हा क्रीजवर आला. कुलदीप व राहुलने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलकडे रिव्ह्यू घेण्याचा आग्रह धरला. रिव्ह्यू घेतल्यानंतर कॅमेरा ३८ वर्षीय रोहितकडे वळवला आणि तेव्हा रोहित हसताना दिसला.
रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की चेंडू रोहितच्या बॅटजवळही गेला नव्हता आणि तो उडून विकेटकीपरकडे गेला होता. त्यामुळे रोहित बाद झाला नाही, तर दिल्लीने एक रिव्ह्यू वाया घातल्यामुळे शेवटी रोहितच वरचढ ठरला. हिटमॅनने केलेला ब्लफ कामी आला. रोहित त्यानंतर पुढच्या षटकात बाद झाल्यामुळे मोठी खेळी करू शकला नाही.
या खेळातील चातुर्यामुळे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचं मन हिटमॅनने जिंकलं. रवी शास्त्री त्यावेळी समालोचन करत होते आणि त्यांनी रोहितच्या डावपेचांना “अप्रतिम” असे म्हटलं. “रोहित शर्मा काय जबरदस्त डावपेच होता. स्क्वेअर लेगकडे पाच यार्ड चालत जाऊन त्याने त्यांना रिव्ह्यू घ्यायला भाग पाडलं. आपण हे पुन्हा पाहायला हवं. रोहित शर्माची ही खूपच अप्रतिम चाल होती,” असं रवी शास्त्री म्हणाले.
