अहमदाबाद कसोटीवर ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व मिळवलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतील चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माचा राग पाहायला मिळाला. मैदानातच त्याने भारताचा सलामीवीर शुभमन गिल याला हलक्या-फुलक्या अंदाजात फटकारलं. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या शांत आणि गंमतीशीर स्वभावामुळे ओळखला जातो. तो संघातल्या इतर सहकाऱ्यांची कधी टर उडवतो तर कधी चेष्टा करतो. आजही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं.
रोहितने हलक्या फुलक्या अंदाजात शुभमन गिलसाठी मैदानात एक अपशब्द वापरला. रोहितची ही प्रतिक्रिया काही लोकांना अनुचित वाटली तर तरुणांना ही एक गंमतच वाटली. ही घटना सामन्याच्या दुसऱ्या दुवशी ऑस्ट्रेलियाच्या डावातील १३३ व्या षटकात घडली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ६ बाद ३८४ धावांवर खेळत होता. उस्मान ख्वाजा १६४ तर मिचेल स्टार्क ४ धावांवर खेळत होते. तेव्हा रोहितचा आवाज स्टम्प्समधील माईकमध्ये रेकॉर्ड झाला.
संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली नाही कारण ब्रॉडकास्टर्स त्यावेळी प्रेक्षकांचं चित्रण दाखवत होते. यावेळी रोहित शर्मा शुभमन गिलला म्हणाला, “ओए गिल ##** बंद कर.” रोहित असं का म्हणाला हे मात्र कळू शकलं नाही.
पाहा व्हिडीओ
हे ही वाचा >> ‘या’ मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेत
कशी आहे सामन्याची स्थिती?
या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा फटकावल्या आहेत. उस्मान ख्वाजा (१८०) आणि कॅमेरून ग्रीन (११४) या दोघांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४८० धावांचा मोठा डोंगर उभा केला. भारताकडून या डावात फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन याने ६ बळी घेतले. तर मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले. रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. यानंतर भारताने सायंकाळी पहिल्या डावात १० षटकात बिनबाद ३६ धावा जमवल्या.